Anita Date Kelkar Praises Amruta Subhash: अभिनेत्री अमृता सुभाष गेल्या काही दिवसांपासून तिच्या ‘जारण’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणाऱ्या अनिता दातेने अभिनेत्री अमृता सुभाषबद्दल केलेले वक्तव्य चर्चेत आहे.

अभिनेत्री अनिता दातेने अमृता सुभाषचे केले कौतुक

‘जारण’ चित्रपटात अमृता सुभाषबरोबर अभिनेत्री अनिता दातेदेखील प्रमुख भूमिकेत आहे. या भयपटातील दोन्ही अभिनेत्रींच्या भूमिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. आता एका मुलाखतीत अनिता दातेने अमृता सुभाषची पहिली भेट कधी झाली होती आणि त्या भेटीची आठवण काय आहे, याबद्दल वक्तव्य केले आहे.

अमृता सुभाष व अनिता दाते यांनी नुकताच अल्ट्रा बझ मराठीशी संवाद साधला. यावेळी अमृताबाबत अनिता दाते म्हणाली, “मी पुण्यात आले त्याआधी मी अमृताचं काम पाहिलेलं होतं. मी जेव्हा तिला पहिल्यांदा बघितलं, तेव्हा ती आणि संदेश म्हणजे तिचा नवरा एकमेकांच्या प्रेमात होते. त्यावेळी ‘साठेचं काय करायचं’ या नाटकाचे प्रयोग सुरू होते. त्या नाटकाचा प्रयोग संपला.”

“प्रयोग संपल्यानंतर तिने संदेशकडे पाहिले. त्यामध्ये दोन्ही गोष्टी होत्या. छान झाला ना प्रयोग आणि कसा झाला प्रयोग? अशा दोन गोष्टी त्यामध्ये होत्या. तो क्षण मी टिपला होता. तर मला तेव्हापासून अमृता आवडते. बऱ्याचदा मला नाटक संपल्यानंतर तिच्या या क्षणाची आठवण येते, कारण दिग्दर्शकाला आपण विचारतो की कसा झाला प्रयोग? तो आपला पहिला प्रेक्षक असतो. तर तेव्हापासून मला अमृता माहिती आहे, तिची अनेक कामं मी पाहिली आहेत.

“आम्ही पूर्वीसुद्धा एकत्र काम केलं आहे. ‘गंध’ सिनेमात आम्ही एकत्र अनेक सीन केले आहेत, पण तेव्हा ती मैत्री नव्हती. त्याचं मला वाईट वाटत होतं. पण, या निमित्ताने ती मैत्री झाली. तिची सगळ्यात आवडणारी गोष्ट ही आहे, ती तुम्हाला प्रोत्साहन देते. अशा लोकांचा आधार वाटतो. ‘जारण’मुळे आमची मैत्री झाली याचा मला आनंद आहे”, असे म्हणत अनिता दातेने अमृता सुभाषचे कौतुक केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आता ‘जारण’ चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.