Ankit Mohan Breaks Silence : ‘देवघर ऑन रेंट’ सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला गैरहजर राहिल्याने दिग्दर्शक व निर्मात्यांनी अंकित मोहनवर गंभीर आरोप केले होते. याशिवाय प्रमोशनला अनुपस्थित राहिल्यामुळे त्याला नोटीस देखील पाठवण्यात आली होती. या संपूर्ण वादावर अखेर अंकित मोहनने आपली बाजू सविस्तरपणे मांडली आहे. सिनेमासाठी विचारणा झाल्यापासून, पुढचा सगळा प्रवास कसा होता…सिनेमाच्या टीमने कशाप्रकारे कमिटमेंट पाळल्या नाहीत याबाबत अंकितने स्पष्ट मतं मांडत खुलासा केला आहे.
अंकिता मोहनने या संपूर्ण वादावर नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली आहे. तो म्हणाला, “मला सिनेविश्वातून यादरम्यान खूप सपोर्ट मिळाला. माझ्या चाहत्यांनी मला साथ दिली. पोस्टवर बऱ्याच कमेंट्स होत्या…त्यामुळे मग मला वाटलं की, हीच माझी बाजू मांडण्याची योग्य वेळ आहे. मी प्रेक्षकांची आधीच माफी मागतो की, मी जरा हिंदीत बोलेन कारण, यामुळे मला माझ्या भावना व्यवस्थित व्यक्त करता येतील. पण, मी मराठी माणूस आहे. तर झालं असं की, साधारण दीड ते दोन वर्षांपूर्वी मला या भूमिकेसाठी दिग्दर्शकाने विचारलं होतं. त्यावेळी एकदम व्यवस्थित त्यांनी मला कथा ऐकवली. तेव्हा ते म्हणाले होते की, हा चित्रपट दोन हिरोंचा आहे एक गँगस्टर आणि दुसरा पोलीस. मी आजवर पोलिसांची भूमिका साकारली नव्हती, त्यामुळे मी सुद्धा विचार केला की, ही चांगली संधी आहे. पुढे, आमच्या मिटींग झाल्या, रिडिंग झालं…शूटिंग सगळं छान झालं. एक नवीन दिग्दर्शक जेव्हा एवढे प्रयत्न करून आपला सिनेमा आणणार असतो तेव्हा त्याला सपोर्ट करणं माझं काम आहे. माझा तोच स्वभाव आहे…पैसे वगैरे मी त्याचा मग फार विचार करत नाही. या सिनेमासाठी मी बरीच कामं सोडली होती…कारण, मी त्यांना कमिटमेंट दिली होती.”
दुसऱ्या अभिनेत्याच्या नावाने सिनेमाची घोषणा, कमिटमेंट पाळली नाही
“त्यांनी समोरून मला प्रॉमिस केलं होतं की, आपण यावर्षी ( २०२५ ) चित्रपट रिलीज करूयात. पीआर टीमबरोबर माझी वैयक्तिक मिटींग झाली. त्यानंतर मग, मला कल्पना न देता त्यांनी दुसरा जो अभिनेता आहे निखिल चव्हाण, त्याच्या प्रोमो-टीझरने सिनेमाची घोषणा केली. त्यांनी मला सांगितलं होतं की, तुझ्या नावाने या सिनेमाची घोषणा होईल. मी जेव्हा याबद्दल त्यांच्याकडे विचारणा केली…तेव्हा सगळेजण एकमेकांना ब्लेम करत होते. मग, ते म्हणाले दुसरा टीझर आपण तुझ्या नावाने रिलीज करू, तो टीझर त्यांनी मला पाठवला सुद्धा होता. पण, कुठेही शेअर केलाच नाही.”
प्रीमियरला सिनेमा पाहून वाटलं, मी फक्त साइड रोल केलाय
“पुढे, त्यांच्या टीमने मला सांगितलं की, तुझं वेगळं पोस्टर रिलीज करूयात. मी त्या फोटोशूटसाठी पुण्याला गेलो होतो. पण, तरीही मी कुठेच नव्हतो. यामध्ये संपूर्ण वर्ष गेलं. हे सगळं २०२५ चं आहे. त्यानंतर मी वाट बघत राहिलो आणि शेवटी मी माझ्या अन्य कामांमध्ये व्यग्र झालो. सुदैवाने, या जानेवारीपासून माझ्याकडे खूप काम आलं.”
“मी आता प्रीमियरला सिनेमा पाहायला गेलो होतो, तेव्हा मला वाटलंच नाही की, हा सिनेमा माझा आहे. मला असं वाटलं की, मी फक्त साइड रोल केलाय. मला स्वत:ला मी जास्त कुठे दिसलोच नाही. जर, तुम्ही अशीच कथा मला सुरुवातीला सांगितली असती, तर मी तेव्हाच नकार दिला असता. सपोर्टिंग कास्टसाठी मी हा सिनेमा साइन केला नव्हता. जर तुम्ही माझी कमिटमेंट पाळली नाही तर, मी सुद्धा तुमच्या कमिटमेंट्स पाळणार नाही हे तत्त्व मी पाळतो. मी आयुष्यात काय आणि किती कष्ट घेतलेत हे फार कुणाला माहिती नाहीयेत.”
मरताना सगळं दूर जाईल पण, हा टॅटू माझ्याबरोबर राहील!
काही मुलाखतींमध्ये दिग्दर्शकाने अंकितच्या ‘जय शिवराय’ बोलण्यावर आणि टॅटूवर कमेंट केली होती. याबाबत सांगताना अभिनेता भावुक झाला होता. तो म्हणाला, “फर्जंद’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान मी एक-एक दिवस जगलोय. खूप मेहनत घेतली होती. शेवटचा सीक्वेन्स शूट होत असताना माझ्या टाचेतून रक्त येत होतं. मला दिग्पालजी म्हणाले होते, अंकित आपण थांबूयात थोडावेळ…पण, मला डोळ्यासमोर संपूर्ण २०० जणांची टीम दिसत होती. ‘पावनखिंड’ सिनेमाच्यावेळी सुद्धा मला १०४ ताप होता. पण, मी केलं. कारण, ती आपली कमिटमेंट असते. मला त्या भूमिकांसाठी माझ्या महाराजांनी निवडलं होतं. मी ‘राजे’ लिहिलंय हातावर…मरताना सगळं दूर जाईल…आपल्याकडे तेव्हा काहीही नसतं पण, हा टॅटू माझ्याबरोबर राहील. ही माझी आयुष्यभराची कमाई आहे. आताही या वादादरम्यान मी सर्वांना हेच सांगितलं, चित्रपट आहे…सर्वांची मेहनत आहे, मी एकही शब्द याविरोधात बोलणार नाही. माझं फक्त इतकंच म्हणणं होतं, जर तुम्ही कमिटमेंट पाळली असती तर, मी सुद्धा या सिनेमाच्या पाठिशी शेवटपर्यंत उभा राहिलो असतो.”
मुलाखतींमध्ये मला टार्गेट केलं
“प्रत्येक मुलाखतींमध्ये त्यांनी फक्त मला टार्गेट केलं…कोणत्याच इंटरव्ह्यूमध्ये सिनेमाविषयी फार बोलले नाहीत. या सगळ्याची काय गरज होती? माझं आणि माझ्या टीमचं आधीच ठरलं होतं की, प्रीमियरला मी जाणार. त्यांना असं वाटतंय नोटीस पाठवली म्हणून मी प्रीमियरला गेलो होतो. पण, खरं सांगायचं झालं तर, मी लीगल नोटीसला घाबरत नाही. तुम्हाला असं वाटत असेल की, मी लीगल नोटीसमुळे प्रीमियरला आलो तर, तो तुमचा भ्रम आहे. मी फक्त पूनम ज्या निर्मात्या आहेत, त्यांच्यासाठी मी गेलो होतो.” असं अंकितने स्पष्ट केलं.
