‘देवघर ऑन रेंट’ या आगामी मराठी सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला सिनेमातील सगळे कलाकार उपस्थित होते. मात्र, या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अंकित मोहनने या सोहळ्याकडे पाठ फिरवली होती. दिग्दर्शक-निर्मात्यांनी भर कार्यक्रमातच “अंकित सरांनी आमचा फोन उचलला नाही, आम्ही त्यांना फोन केला असता…मला कॉल करू नका असा त्यांचा मेसेज आला” असं सांगितलं. यामुळे सोशल मीडियावर सुद्धा चर्चांना उधाण आलं. आता यादरम्यान अंकित मोहनने शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊयात…
‘देवघर ऑन रेंट’ सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडल्यावर या टीमने ‘एबीपी माझा’मध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी, नेमकं काय झालंय विचारलं असता सिनेमाचे दिग्दर्शक-निर्माते म्हणाले, “एखादा सिनेमा बनवण्यासाठी दिग्दर्शक जशी मेहनत घेतो…त्याचप्रमाणे निर्माता सुद्धा महत्त्वाचा असतो. आमचं शूट खूप फ्रेंडली वातावरणात पूर्ण झालं. एकंदर सेटवर सुद्धा सगळं छान होतं, सगळे आनंदी होते. अंकित सर असं काही वागतील याची आम्ही अपेक्षाच केली नव्हती. स्वरुप सरांना तर त्यांनी ब्लॉक केलंय. मग, टीमने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला…त्यांनी कुणाचेही फोन उचलले नाहीत. मग मला निर्माती म्हणून टेन्शन आलं…कारण, प्रमोशनला प्रत्येक कलाकाराचा एक फॅनबेस असतो. मला वाटलं होतं निर्माती म्हणून माझा फोन कदाचित ते उचलतील. मी त्यांना दोनदा फोन केला, त्यांनी कट केला. मग, मी त्यांना मेसेज केला आणि सांगितलं, तुम्ही जेव्हा फ्री व्हाल तेव्हा मला फोन करा. यावर त्यांचं उत्तर आलं, “मी बिझी आहे, फोन करू नका.”
याबाबत सिनेमाचे दिग्दर्शक म्हणाले, “ते बिझी नव्हतेच…मध्यंतरी त्यांनी एक अल्बम साँग केलं, त्या सगळ्या प्रमोशनला ते फिरत होते. अंकित सरांचा फोन आला की, ते जय शिवराय म्हणतात. फक्त जय शिवराय बोलून, हातावर राजे लिहून काही होत नाही. तुम्ही मराठीसाठी काहीतरी केलं पाहिजे.”
तर, अभिनेता निखिल चव्हाण याबाबत म्हणाला, “नुसतं जय शिवराय बोलून काही होत नाही…तुम्ही मराठीला इतकं मानता मग अशा गोष्टी करायच्या नाहीत. या गोष्टीचा मला खरंच राग आलाय…पण, मला आपल्या मराठी इंडस्ट्रीसाठी राग आलाय…आमच्या सिनेमासाठी नाही. कारण, ही आपली इंडस्ट्री आहे, इथे असं घडू नये. बरं तो माणूस म्हणून खूप चांगला आहे. कलाकारही चांगला आहे….अर्थात त्याच्या ज्या काही समस्या आहेत, त्या त्याने सांगाव्यात. पण, असा सिनेमावर राग काढू नये.”
आता या दरम्यान अंकितने शेअर केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे. अभिनेत्याने कोणाचंही नाव न घेता तलवारबाजीचा व्हिडीओ शेअर केला आहे. तो लिहितो, “जय शिवराय “हे फक्त नाव नाही, हा एक भाव आहे, श्रद्धा आहे, प्रेम आहे, समर्पण आहे…आणि मी या भावनेत पूर्णपणे समर्पित झालो आहे. जोर से बोलो ‘जय शिवराय’ हर हर महादेव! लवकरच एका नवीन भूमिकेत भेटूया, अशी भूमिका जी या जन्मात साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो!! तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.”
अंकितच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी ‘जय शिवराय’ अशा कमेंट्स केल्या आहेत. याशिवाय “कोण काय बोलतंय याकडे लक्ष देऊ नका”, “दादा ट्रोलिंग होतंय नेमकं काय झालंय” अशाही कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
