Ankit Mohan on Gave Up Non-Veg and Spiritual Journey: अंकित मोहनने हिंदी मालिकांबरोबरच मराठी सिनेसृष्टीतही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. फतेशिकस्त, पावनखिंड या सिनेमांतील त्याच्या भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता त्याने एका मुलाखतीत मांसाहार सोडून शाकाहाराकडे वळल्याचे सांगितले आहे.

“जेव्हा तुमच्या आयुष्यात…”

अभिनेत्याने काही दिवसांपूर्वी ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने विविध विषयांवर गप्पा मारल्या. त्याच्या व्यावसायिक आयुष्य आणि वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींबाबत त्याने मोकळेपणाने संवाद साधला. याच मुलाखतीत त्याने मांसाहार सोडण्याबद्दल तसेच, अध्यात्माबद्दलही वक्तव्य केले. तो नेमकं काय म्हणाला, ते जाणून घेऊ…

अंकित मोहन म्हणाला, “जेव्हा तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं होणार असतं, तेव्हा तुमच्याकडे त्याच्या काही जबाबदाऱ्याही येतात. त्या जबाबदाऱ्या सार्थ ठरवणं महत्त्वाचं आहे. मी आधीही आध्यात्मिक होतो. मी वीर मुरारबाजी हा चित्रपट करत असताना श्रीकृष्णाला मी समर्पित झालो. त्यावेळी पुण्यात मी इस्कॉनमध्ये राहत होतो. तिथे बसून मी स्क्रिप्टवर काम करत होतो. नामजप करायचो. तिथून माझं आयुष्य बदललं.”

पुढे तो म्हणाला, “ज्या माणसाचं २५-३० वर्षांच्या करिअरमधील दिवसातील पाच ते सहा वेळा जेवणात मांसाहार असायचा. आज मी शुद्ध शाकाहारी आहे. सात महिन्यांपासून मी शुद्ध शाकाहारी आहे. “

अंकितने असेही सांगितले, “जेव्हा मी मांसाहार करायचो, त्यानंतर देवाचं नाव घ्यायला मला संकोच वाटत असे. शाकाहार करण्याचे अनेक फायदे आहेत. डोकं शांत होतं. तुमची त्वचा चांगली राहते. तुमचे विचार चांगले होतात. खूप सकारात्मक वाटतं. सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की, मी कोणत्याही वेळी देवाचं नाव घेऊ शकतो.”

अंकित असेही म्हणाला की, देवावर विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, अंकितला नवीन भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.