Ankita Prabhu Walawalkar in Cannes Film Festival : कान्समध्ये ७९ वा ‘कान्स फिल्म फेस्टिवल सोहळा’ मागील महिन्यामध्ये पार पडला. त्यामध्ये सहभागी झालेल्या भारतातील कलाकार, अभिनेत्री आणि मॉडेल्सची सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. विशेष बाब म्हणजे यंदाच्या वर्षी मराठी कलाकारांनीही रेड कार्पेटवर दिमाखदार एन्ट्री घेतली. महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा यांचे अभिमानाने सादरीकरण करून त्यांनी आंतरराष्ट्रीय मंचावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

यामध्ये अभिनेते अशोक सराफ, अभिनेत्री निवेदिता सराफ, प्राजक्ता माळी, जयंती वाघधरे आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता प्रभू वालावलकर हे सहभागी झाले होते. मराठीचे प्रतिनिधित्व केलेल्या अंकिताचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक झाले. मात्र, काहींनी तिला कान्समध्ये जाण्यावरून ट्रोल केले. या सर्व ट्रोलर्सना ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर हिने सडेतोड उत्तर दिले आहे.

कान्समध्ये इन्फ्लुएन्सरचे काय काम होते?

‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून सोशल मीडियावर प्रचंड गाजलेली ‘बिग बॉस’फेम इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर हिने गुलाबी रंगाच्या पैठणी स्टाईल गाऊनने सर्वांचे लक्ष वेधले होते. अंकिताने महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जागतिक व्यासपीठावर प्रतिनिधित्व केल्याबद्दल चाहत्यांनी तिचे आणि तिच्या लूकचे जोरदार कौतुक केले. मात्र, काही नेटकऱ्यांनी, तो फिल्म फेस्टिवल असून, त्यामध्ये इन्फ्लुएन्सरचे काय काम होते आणि ती तिथे का गेली, असे प्रश्न उपस्थित करत तिला ट्रोल केले. अंकिताने या सोशल मीडिया ट्रोलर्सना स्पष्ट शब्दांत उत्तर दिले आहे.

अभ्यास केलेला नसल्याने गोष्टी माहीत नसतात – अंकिता

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर हिने ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘कान्स फिल्म फेस्टिवल’वरून होणाऱ्या ट्रोलिंगबाबत स्पष्ट मत मांडले. अंकिता म्हणाली की, अनेकांनी बऱ्याच गोष्टींबाबतचा अभ्यास केलेला नसल्याने त्यांना त्या गोष्टी माहीत नसतात. त्या फेस्टिवलचे नाव जरी ‘फिल्म फेस्टिवल’ असले तरी ते फक्त सिनेमांपुरते मर्यादित नाही. तिथे फिल्मचे नेटवर्किंग आणि ब्रॅण्डिंगही केले जाते. ती जागा ग्लोबल नेटवर्किंगसाठी आहे. कान्स फेस्टिवलमध्ये ब्यूटी ब्रॅण्डसुद्धा प्रमोशन करीत असतात आणि ते कार्यक्रमाचे स्पॉन्सर्ससुद्धा असतात. मोबाईलचे ब्रॅण्डसुद्धा तिथे स्पॉन्सर्स असतात त्यामुळे तेसुद्धा तिथे प्रमोशन करत असतात.

कान्समध्ये चित्रपटासाठीसुद्धा जाऊ शकते – अंकिता वालावलकर

पुढे अंकिता म्हणाली की, आम्ही तिथे मराठी भाषेला प्रमोट करण्यासाठी गेलो होतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, हे सांगण्यासाठी तिथे गेलो होतो. त्यामुळे तिथे फक्त सिनेमांशी संबंधित लोकच येतात, असे नाही; तर तिथे नेटवर्किंगही मोठ्या प्रमाणात सुरू असतं. तिथे जाऊन महाराष्ट्र बूथला जाऊन भेट देता आली. तिथे काय गोष्टी सुरू असतात आणि कशा प्रकारे हे काम चालतं हे बघता आलं. तिथे जाऊन मी खूप गोष्टी पाहिल्या आणि अनुभवल्या आहेत. त्यामुळे मला खूप चांगलं वाटलं. आज हे सर्व एक इन्फ्लुएन्सर म्हणून पाहिल्या असल्या तरी काय माहीत; पुढे तिथे एखाद्या चित्रपटासाठीसुद्धा जाऊ शकते, असे परखड उत्तर अंकिता प्रभू वालावलकर हिने दिले आहे.