‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण ठरला होता. त्याचा पहिला सिनेमा ‘झापुक झुपूक’ नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. खरंतर, ‘गुलीगत किंग’ची लोकप्रियता पाहता त्याच्या पहिल्या सिनेमाकडून सर्वांनाच प्रचंड अपेक्षा होत्या पण, बॉक्स ऑफिसवर ‘झापुक झुपूक’ला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. सूरजबद्दल आणि सध्याच्या इन्फ्लुएन्सर्सबद्दल ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकरने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट मत मांडलं आहे.
अंकिता अमृता राव यांच्याशी संवाद साधताना म्हणाली, “मला अनेक चित्रपटांसाठी विचारणा झाली होती. पण, लीड रोलसाठी कधीही ऑफर आलेली नाहीये. सध्या Influencer हा शब्द आपण प्रत्येक ठिकाणी ऐकतो. या इन्फ्लुएन्सर शब्दाचा अर्थ अजूनही अनेकांना समजलेला नाही. कारण, प्रत्येक जण स्वत:ला इन्फ्लुएन्सर म्हणतोय…पण, कोणीच स्वत:ला क्रिएटर म्हणत नाहीये. तुमच्यामुळे खरंच लोक इन्फ्लुएन्स होत आहेत का? इन्फ्लुएन्स होण्यासारखं खरंच तुम्ही लोकांना काही देताय का? हे अनेकांना आजही क्लिअर नाहीये.”
‘कोकण हार्टेड गर्ल’ पुढे म्हणाली, “दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, इंडस्ट्री असो किंवा सोशल मीडियावर… सगळीकडे इन्स्टाग्रामच्या फॉलोअर्सचा आकडा पाहिला जातो. अरे… हिच्याकडे खूप फॉलोअर्स आहेत आपण हिला घेऊयात अशी मानसिकता लोकांची झालेली आहे.”
सूरजचे फॅन्स मोठ्या प्रमाणात असूनही चित्रपट का चालला नाही? यावर अंकिता म्हणाली, “सूरजचे जे फॅन्स आहेत ते सगळ्यात जास्त गावाकडचे आहेत. त्यामुळे त्या सगळ्या लोकांना थिएटरपर्यंत आणणं ही खूप कठीण गोष्ट आहे. सूरज फेमस झाला तेव्हा वातावरण तसं होतं. सूरजचा स्वभाव, त्याचा साधेभोळेपणा सर्वांना आवडला म्हणून तो सर्वत्र चर्चेत आला. पण, आता एक सूरज झाला म्हणून, तसे १० सूरज होऊ शकणार नाहीत हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे.”
अलीकडच्या काळातील इन्फ्लुएन्सर्सबद्दल अंकिता म्हणाली, “अनेक लोक बायोमध्ये लिहितात हॅशटॅग गरीबाचं पोरगं, हॅशटॅग गरीबाचं लेकरू…हे करण्यापेक्षा आपण एखाद्या गोष्टीवर मात करून पुढे गेलं पाहिजे. सूरज गरीब होता म्हणून फेमस झाला असा विचार जे लोक करतात तो विचार अत्यंत चुकीचा आहे. आजकालचे लोक असाच चुकीचा समज करून इन्फ्लुएन्स होतात.”