Ankush Chaudhary Talks About Ashok Saraf : अशोक सराफ मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार आहेत. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. विनोदी भूमिकांमध्ये तर त्यांचा हातखंडा आहे. सध्या ते ‘पुन्हा साडे माडे ३’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत.
लोकप्रिय अभिनेता अंकुश चौधरी दिग्दर्शित ‘पुन्हा साडे माडे ३’ हा चित्रपट १३ फेब्रुवारी रोजी सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्त अंकुश चौधरी व अशोक सराफ यांनी ‘एबीपी माझा’ला मुलाखत दिली आहे, ज्यामध्ये अंकुशने चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक किस्सा सांगितला आहे. त्याने यावेळी अशोक सराफ यांचं कौतुक करत कामाप्रति असलेल्या त्यांच्या प्रेमाबद्दल सांगितलं आहे.
सेटवर अशोक सराफ यांना झालेली दुखापत
मुलाखतीत अंकुश म्हणाला, “चित्रपटाच्या सेटवर एक अॅक्शन सीन करताना अशोक सराफ यांना दुखापत झालेली. त्यांच्या तीन बरगड्या फ्रॅक्चर झालेल्या तरीसुद्धा त्यांनी शूटिंग पूर्ण केलं. जेव्हा आम्ही त्यांना निवेदिता ताईंना कळवू का, कुठल्या डॉक्टरांना सांगू का असं विचारलं तेव्हा त्यावर ते म्हणाले नको नको तिला सांगितलं तर ती धावत इकडे येइल. तुमचं काम होणार नाही. चालणारंय का तुम्हाला. आम्हाला काय बोलावं कळत नव्हतं. त्यांच्या डोळ्यांमध्ये दिसत होतं की खूप त्रास होतोय. नंतर पॅकअप झालं. ते मुंबईला आले. त्यानंतर त्यांनी एक्सरे काढला आणि तेव्हा कळलं की त्यांच्या बरगड्या फ्रॅक्चर होत्या. दोन-तीन दिवस ते शूटिंग त्यातच करत होते कारण शूटिंग थांबू नव्हे.”.
अशोक सराफ यावर म्हणाले, “जर निवेदिताला सांगितलं असतं, तर शूटिंगच झालं नसतं. मुंबईत जाऊन एक्सरे काढले तेव्हा कळलं की, तीन बरगड्या फ्रॅक्चर होत्या आणि तरी मी त्यात काम केलं. मला उभंही राहता येत नव्हतं. पण त्यात मी अॅक्शन सीन केला आणि नंतर विचार केला की मी कसं केलं असेल.” चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अंकुश चौधरी, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, रिंकू राजगुरू, सिद्धार्थ जाधव आणि अशोक सराफ यांनी अनेक मुलाखती दिल्या. बऱ्याचशा मुलाखतींमध्ये या कलाकार मंडळींनी अशोक सराफ यांचं कौतुक केलं.
‘साडे माडे ३’ या चित्रपटाचं आधी अंकुश चौधरी व अभिनेता सचित पाटील यांनी दिग्दर्शन केलेलं. परंतु, आता ‘पुन्हा साडे माडे ३’ या सीक्वेलच्या दिग्दर्शनाची धुरा पूर्णपणे अंकुश चौधरी यानं सांभाळली आहे. तसेच हा चित्रपट आधी ३० जानेवारीला प्रदर्शित होणार होता; परंतु काही कारणांमुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आणि आता हा चित्रपट १३ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
‘पुन्हा साडे माडे ३’मधून अनेक वर्षांनंतर अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव हे मराठीतील सुपरस्टार एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. त्यामुळे मराठी प्रेक्षकांसाठी ही जणू पर्वणीच आहे.

