अभिनेता अंकुश चौधरी लवकरच ‘पी.एस.आय. अर्जुन’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अंकुश पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अंकुशसह छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अक्षया हिंदळकरही झळकणार आहे.
अक्षया पहिल्यांदाच या चित्रपटातून अंकुश चौधरीसह महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट येत्या ९ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे, तर चित्रपटाच्या ट्रेलर लाँचदरम्यान अंकुश चौधरीने या चित्रपटातील अक्षयाच्या कास्टिंगचा किस्सा सांगितला आहे.
चित्रपटातील कलाकारांबद्दल बोलताना त्याने अक्षयाची या चित्रपटासाठी निवड करण्यामागचं कारण सांगितलं आहे. अंकुश म्हणाला, “मी अक्षयाच्या एका मालिकेतील तिचा एक सीन पाहिला होता, ज्यामध्ये ती मालिकेतील नायकाच्या किंवा खलनायकाच्या पण कोणाच्यातरी कानाखाली मारत असते. तेव्हा तिचा तो सीन पाहून मी म्हटलं की, अरे ही तर चित्रपटाची नायिका आहे. तेव्हा मी ते लक्षात ठेवलं होतं.”
यासह तो असंही म्हणाला, “यासाठी आमच्या चित्रपटाच्या निर्मात्यांनीही मला पाठिंबा दिला. ते म्हणाले, तुम्हाला जर ही अभिनेत्री योग्य वाटत असेल तर आपण तिचीच निवड करुयात. नाहीतर एरवी असं होतं की, नायिकेच्या भूमिकेसाठी लोकप्रिय चेहराच हवा, असं काही निर्मात्यांचं म्हणणं असतं.”
पुढे अक्षयाच्या कामाबद्दल बोलताना अंकुश म्हणाला, “तिने या चित्रपटात खूप चांगलं काम केलं आहे. कलाकारांनी चित्रपटात दिसण्यापासून असण्यापर्यंत सगळ्यांनीच चांगलं काम केलं आहे.” ‘पी.एस.आय. अर्जुन’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा भूषण पटेलने सांभाळली आहे, तर संदीप दंडवते याने चित्रपटाचं लेखन केलं आहे. या चित्रपटात अंकुश चौधरीसह अक्षया हिंदळकर, किशोर कदम, राजेंद्र शिसतकर यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
अक्षया हिंदळकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने आजवर ‘साता जलमाच्या गाठी’, ‘तुझ्या इश्काचा नाद खुळा’, ‘पुन्हा कर्तव्य आहे’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे; तर तिने ‘रॉकी’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. अशातच आता लवकरच अक्षया अंकुश चौधरीच्या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. तर ही फ्रेश जोडी पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.
दरम्यान, अभिनेता अंकुश चौधरी शेवटचा ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटात झळकला होता. हा शाहीर साबळे यांचा चरित्रपट असून अंकुश चौधरीने यामध्ये शाहीर साबळे यांची भूमिका साकारली होती. यानंतर आता अभिनेता लवकरच ‘पी.एस.आय.अर्जुन’ या चित्रपटातून एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे