Rinku Rajguru In Punha Ekda Sade Made Teen : कुरळे बंधू हे प्रेक्षकांचे लाडके त्रिकुट २० वर्षांनी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच ‘साडे माडे तीन’ सिनेमाचा सिक्वेल म्हणजेच ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा सिनेमा रिलीज होणार आहे. सिनेमात अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव ही मंडळी आहेतच. पण यांच्यात एका अभिनेत्रीची एन्ट्री झाली, ही अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू.
‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’मध्ये रिंकू राजगुरूची एण्ट्री विशेष लक्ष वेधून घेते. ती नेमकी कोण आहे, ती या तिघांच्या आयुष्यात का आली आहे आणि तिच्या येण्याने सगळेच इतके अस्वस्थ का झाले आहेत, याची छोटीशी झलक सिनेमाच्या ट्रेलरमधून पाहायला मिळाली आहे. त्यामुळेच तिच्या भूमिकेबाबत एक कुतूहल निर्माण होतं. अशातच तिच्या कास्टिंगबद्दल दिग्दर्शक अंकुश चौधरीने खुलासा केला आहे.
लोकसत्ताशी साधलेला संवादात ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’मध्ये रिंकूचं कास्टिंग का आणि कसं केलं गेलं, याबाबत अंकुशने प्रतिक्रिया दिली. यावेळी तो म्हणाला, “तिच्या कास्टिंगचं महत्त्वाचं कारण म्हणजे मला एक अशी मुलगी हवी होती, जिने या तिघांबरोबर (अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे) आधी कधीच काम केलेलं नसावं, कारण यांच्या आयुष्यात एखादी मुलगी नव्याने येते, तेव्हा ती कशी प्रतिक्रिया करेल, याबद्दल त्यांना माहिती नसेल आणि तिच्याबद्दल हे कसे प्रतिक्रिया देतील याबद्दल तिला माहीत नसेल. ती उत्तम अभिनेत्री आहे, यात शंका नाही. तिने आजपर्यंत केलेल्या कामातून मला हे जाणवलं की, अशोक सराफ भरत जाधव, मकरंद अनासपुरे यांच्याबरोबर ती आत्मविश्वासाने उभी राहील.”
यापुढे अंकुश म्हणाला, “तिच्यातली दुसरी आवडलेली गोष्ट म्हणजे. ती अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर जोरात हसते. आम्ही एक-दोनदा काही कार्यक्रमांच्या निमित्ताने भेटलो आहोत, तर यातून मला हे जाणवलं की, तिला छोट्याश्या गोष्टीत विनोद सुचतो आणि ती खुलून हसते. तेच हसणं मला हवं होतं. जे तिच्याकडे आहे. त्यामुळे तिचं या चित्रपटासाठी कास्टिंग करण्यात आलं.”
दरम्यान, ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा सिनेमा ३० जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता. पण अजित पवारांच्या निधनामुळे सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा सिनेमा येत्या ६ फेब्रुवारी रोजी रिलीज होईल.

