‘दुनियादारी’ हा मराठी सिनेसृष्टीतील अशा चित्रपटांपैकी एक आहे ज्याची क्रेझ कदाचित कधीच कमी होणार नाही. चित्रपटातील कलाकर, त्यांची पात्र, कथा, गाणी हे सगळं आजही प्रेक्षकांना तितकंच आवडतं. यामध्ये अनेक लोकप्रिय कलाकार झळकले होते. त्यापैकीच एक म्हणजे अंकुश चौधरी. अंकुशने यामध्ये नेहमीपेक्षा वेगळी भूमिका साकारत लक्षं वेधलं. महत्त्वाचं म्हणजे यामधील त्याच्या पात्रावर, प्रेमकहाणीवर आजही अनेक मिम्स बनतात. अशातच आता याच चित्रपटातील त्याच्या नायिकेबरोबरचा फोटो त्याने नुकताच शेअर केला आहे.
संजय जाधव दिग्दर्शित २०१३मध्ये प्रदर्शित झालेला ‘दुनियादारी’ चित्रपटात मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय कलाकारांची फौज पाहायला मिळाली होती. चित्रपटातील प्रत्येक पात्र आणि त्यांचा संवाद आजही प्रेक्षकांना तोंडपाठ आहे. आजही अनेक जण तितक्याच आवडीने हा चित्रपट पाहतात. यामध्ये स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, उर्मिला कानेटकर,जितेंद्र जोशी, सुशांत शैलार, रिचा असे अनेक कलाकार झळकले होते. अंकुशने यामध्ये दिग्या हे पात्र साकारलं होतं तर रिचाने त्याच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. दोघांची चित्रपटातील लव्हस्टोरी खूप हिट झाली होती. त्यांच्या लव्हस्टोरीवर चित्रपटात गाणंही होतं. आजही त्याची क्रेझ तशीच आहे. अशातच आता रिचाने पुन्हा एकदा अंकुशबरोबर स्क्रीन शेअर केली आहे.
अंकुश चौधरी सध्या त्याच्या ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ३१ जुलै रोजी हा चित्रपट सिनेमागृहात रिलीज झाला. त्याच्याबरोबर यामध्ये कुशल बद्रिके, संतोष जुवेकर हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. विजू माने यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात अभिनेत्री रिचासुद्धा झळकली आहे. अंकुशने नुकतंच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल सांगितलं आहे. महत्त्वाचं म्हणजे ‘दुनियादारी’मध्ये काम केल्यानंतर रिचा व अंकुशने तब्बल १३ वर्षांनंतर पहिल्यांदाच एकत्र काम केलंय. अंकुशने या पोस्टला भन्नाट कॅप्शन दिली आहे.
अंकुशची पोस्ट चर्चेत
रिचाबरोबचा चित्रपटातील लग्नाच्या लूकमधील फोटो शेअर करत अंकुश कॅप्शनमधून म्हणाला, “जे दिग्याला नाही जमलं ते मामाने केलं! लग्नाला नाही बोलवता आलं, पण सिनेमाला नक्की यायचं हां! सहकुटुंब, सहपरिवार मामाच्या गोव्याला जाऊया मनमुराद आनंद घेऊया… तुमच्या जवळच्या सिनेमागृहात!” महत्त्वाचं म्हणजे याही चित्रपटात रिचाच्या भूमिकेचं नाव सुरेखा असंच आहे. त्यामुळे ‘दुनियादारी’नंतर प्रेक्षकांना पुन्हा एकदा अंकुश व रिचाला एकत्र पाहायला मिळत आहे.
‘दुनियादारी’ या चित्रपटातील दिग्या व सुरेख यांची प्रेमकहाणी खूप गाजली होती. परंतु, ऐनवेळी वडिलांच्या आग्रहामुळे सुरेखाला त्यांच्या पसंतीच्या मुलाशी लग्न करावं लागलं. त्यामुळे त्या चित्रपटात या दोघांची प्रेमकहाणी अपूर्ण राहिली मात्र ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ चित्रपटात या ऑनस्क्रीन जोडीचं अखेर लग्न होताना दिसतं.
सध्या काय करते सुरेखा?
‘दुनियादारी’ चित्रपटातून सुरेखाची भूमिका साकारत लोकप्रियता मिळवलेली रिचा आता ‘मामाच्या गोव्याला जाऊया’मध्ये झळकत असली, तरी, मधल्या काळात ती मनोरंजन क्षेत्रात फारशी सक्रिय नव्हती. अभिनेत्री सोशल मीडियावरही फार सक्रिय नसते. परंतु, तिच्या इन्स्टाग्राम बायोमधून ती आयटी क्षेत्रातही काम करत असल्याचं समजतं. तिने भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेतल्याची माहितीसुद्धा यामधून मिळते. ‘दुनियादारी’ व्यतिरिक्त तिने केदार शिंदे यांच्या ‘ऑन ड्युटी २४ तास’मध्येही काम केलं होतं.
