Ankush Chaudhuri Upcoming Action Film Shatru : अंकुश चौधरी मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत अनेक चित्रपटांतून विविध भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. प्रेमकथा ते अॅक्शन अशा विविध जॉनरच्या चित्रपटात त्याने काम केलं आहे. अशातच आता अभिनेता एका नवीन चित्रपटातून येत्या काळात प्रेक्षकांसमोर येणार आहे.
अंकुश चौधरीने आतापर्यंत ‘सावरखेड एक गाव’, ‘नो एन्ट्री’, ‘दुनियादारी’, ‘क्लासमेट’, ‘दगडी चाळ’, ‘ती सध्या काय करते’ आणि ‘महाराष्ट्र शाहीर’ अशा अनेक वेगवेगळे विषय असलेल्या चित्रपटांत काम केलं आहे. कधी प्रियकर तर कधी खलनायक म्हणून तो प्रेक्षकांसमोर आला आहे. अशातच आता अभिनेता पुन्हा एकदा एका आगळ्या वेगळ्या भूमिकेतून समोर येणार आहे. नुकताच त्याच्या आगामी चित्रपटासंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.
अंकुश चौधरी ‘या’ अॅक्शन चित्रपटातून झळकणार
अंकुश चौधरीच्या या आगामी चित्रपटाचं नाव ‘शत्रू’ असं आहे. नावावरुनच अंकुशच्या यामधील भूमिकेचा अंदाजा येतो. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अंकुश चौधरी हटके लूकमध्ये पाहायला मिळत आहे. मोठा चश्मा, गळ्यातील लॉकेट आणि वेगळ्या वेशभूषेमुळे त्याच्या लूकनेही लक्ष वेधलं आहे. यामध्ये तो सिगारेट ओढताना दिसत आहे. ‘दुनियादारी’ आणि ‘दगडी चाळ’नंतर आता अभिनेता पुन्हा एकदा अॅक्शन थ्रिलर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
चित्रपट कधी प्रदर्शित होणार?
शत्रू या चित्रपटाची निर्मिती अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि तिचा नवरा अभिषेक जावकरने केली आहे. तर अभिषेक जावकरच या चित्रपटाचा दिग्दर्शक व सिनेमॅटोग्राफ आहे. ‘२०२७ चा सर्वात मोठा अॅक्शन पॅक्ड अनुभव – ‘शत्रू’! रेडबल्ब स्टुडिओज् प्रस्तुत ‘शत्रू’२०२७ पासून…. ‘ अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे.
डोळ्यांवरील मोठा चश्मा, हातातली अंगठी आणि सिगारेट आणि तेच समोर सुरू असलेला अॅक्शन सीन यामुळे अंकुश चौधरीची भूमिका नेमकी कशी असेल आणि या चित्रपटाची कथा कशी असेल याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. अद्याप नेमकी तारीख जाहीर झालेली नसली तरी पुढच्या वर्षी २०२७मध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे.
दरम्यान, अंकुश चौधरीसह ‘शत्रू’ या चित्रपटा कोणती अभिनेत्री झळकणार आणि यामध्ये कोणते इतर कलाकार पाहायला मिळणार याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
