Ankush Choudhary on importance of the letter D: गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा साडे माडे तीन या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, भरत जाधव तसेच रिंकु राजगुरू हे कलाकार या चित्रपटात महत्वाच्या दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश चौधरीने केले आहे. त्यामुळे अंकुश चौधरी सध्या चर्चेत आहे.
याबरोबरच, अंकुश चौधरी नुकताच देवखेळ या वेब सीरिजमध्येदेखील दिसला. या वेब सीरिजमध्ये त्याने इन्स्पेक्टर विश्वास सरंजामे ही भूमिका साकारली आहे. या वेब सीरिजमधून अंकुश चौधरीने ओटीटीवर पदार्पण केले आहे.
अशातच अंकुश चौधरीने एका जुन्या मुलाखतीत केलेले वक्तव्य सध्या लक्ष वेधून घेताना दिसत आहे. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने डी अक्षराचे त्याच्या आयुष्यात काय महत्व आहे, हे सांगितले होते.
“माझ्या आयुष्यातील डीचे महत्व…”
राजश्री मराठीशी साधलेल्या संवादात अंकुश चौधरी म्हणालेला, “आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील डीचे महत्व सांगणार आहे. माझ्या करिअरमध्ये लागोपाठ ३ फिल्म अशा झाल्या, त्याची सुरुवात ‘डी’ने झाली. दुनियादारी, डबल सीट आणि दगडी चाळ या तिन्ही चित्रपटांची सुरुवात डीने होते.”
अभिनेता पुढे म्हणालेला, “सुरुवात डीने झाली आणि मला अचानक वाटलं की दुनियादारी, डबल सीट या दोन्ही फिल्म चालल्या. लोकांना आवडल्या आणि लोकांनी त्या डोक्यावर घेतल्या.”तो प्रेक्षकांना उद्देशून असेही म्हणाला होता की हे सगळे तुमचे आशीर्वाद आहेत.
माझ्या एका मित्राने माझ्या असं लक्षात आणून दिलं होतं की ४ नंबर मला खूप फॉलो करतोय. माझा वाढदिवस आहे ३१ जानेवारीला असतो. त्याची एकूण बेरीज चार येते. माझ्या पत्नीचा वाढदिवस ३१ ऑक्टोबरला असतो. त्याची एकूण बेरीज चार आहे. मी ज्या इमारतीत राहतो, तो तेरावा मजला आहे. पुन्हा चार हा अकडा येतो. माझ्या फ्लॅटचा नंबर हा ९०४ आहे. पुन्हा बेरीज ही चार येते. हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा डी सुद्धा चौथ्या क्रमांकावर आहे. आता मला माहित नाही की चार नंबर मला फॉलो करतोय की मी त्याला फॉलो करतोय.
अभिनेता असंही म्हणालेला की डी म्हणजे ढ आहे असं नाही. डी म्हणजे देव, देवाचा आशीर्वाद आहे, देव बाप्पा आहे. त्याचा आशीर्वाद सदैव तुमच्या आणि माझ्या पाठीशी राहू दे.
दरम्यान, देवखेळमधील त्याच्या अभिनयाचे कौतुक होताना दिसत आहे. या वेब सीरिजमध्ये प्राजक्ता माळी, वीणा जामकर हे कलाकारही प्रमुख भूमिकेत दिसत आहेत.

