Anshuman Joshi Talks About Shala Movie : इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत, जे लहानपणापासून मनोरंजन विश्वात काम करत आहेत. यापैकीच एक म्हणजे अंशुमन जोशी. ‘शाळा’ या चित्रपटातून घराघरांत पोहोचलेला आणि मराठी प्रेक्षकांची मनं जिंकलेला अंशुमन सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

अंशुमननं अलीकडेच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा गोरेसह लग्न केलं. दोघांनी मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांच्या साक्षीनं थाटामाटात पारंपरिक पद्धतीनं लग्न केलं. लग्नानंतर दोघांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबद्दलही सांगितलं आहे.

‘शाळा’बद्दल अंशुमनची प्रतिक्रिया

अंशुमनला यावेळी ‘शाळा’नंतर तू पुन्हा नवीन कुठल्या कलाकृतीतून दिसला नाहीस, तू इतर कामं करत असशील, लेखन किंवा फिल्ममेकिंग; पण ‘शाळा’मुळे जी लोकप्रियता मिळाली तसं एखादं काम तुझ्याकडे आलं नाही का? असं विचारल्यानंतर तो म्हणाला, “मी त्या शोधात होतोच. माझी गंमत अशी झाली की मी शाळामध्ये काम केलं तेव्हा दहावीत होतो. १४ वर्षांचा होतो.पण, सिनेमा रिलीज झाला दोन वर्षांनंतर. २०१० मध्ये चित्रपटाचं शूटिंग संपलेलं, तोपर्यंत माझी दहावीची परीक्षा झाली होती. सिनेमा रिलीज झाला २०१२ मध्ये. चित्रपटात जसा मी दिसत होतो तसा खऱ्या आयुष्यात तेव्हा दिसत नव्हतो, कारण शूटिंग आणि रिलीजमध्ये दोन वर्षे गेले.”

Award Banner

अंशुमन पुढे म्हणाला, “चित्रपट जेव्हा हिट झाला तेव्हा असं झालं की त्या मुलाला बोलवा. माझं असं व्हायचं की मी शेजारीच उभा आहे. त्याच्यानंतर मला १८ सिनेमांसाठी विचारणा झाली, पण नंतर काही कारणांमुळे मला त्यात घेतलं नाही. तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे फारच परस्परावलंबी आहे, आपण अजून काहीतरी वेगळं केलं पाहिजे, म्हणून मी नाटकात खूप काम केलं. पण, तेव्हा मला जाणवलं की मी सिनेमा करण्यातच रमतो.”

अंशुमन पुढे म्हणाला, “मला माझी गोष्ट सांगायला आवडते. मला फक्त लिहायलाच नाही तर दिग्दर्शनही करायला आवडतं. यादरम्यान मी १६ चित्रपट केले, पण प्रत्येक चित्रपटात मी वेगळा दिसलो आहे. आता माझा कल माझी गोष्ट सांगण्याकडेच आहे. मला अभिनय करायचा नाहीये असं नाही, पण माझं प्राधान्य आता स्वत:चा सिनेमा आणि नाटक करण्यात आहे.”