मनोरंजन विश्वात गेल्या काही दिवसांपासून ‘गांधी टॉक्स’ सिनेमाची जोरदार चर्चा सुरू होती. आता प्रेक्षकांना ओटीटीवर ( ZEE5 – 6th March ) सुद्धा हा सिनेमा पाहता येणार आहे. या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात चर्चा होण्याचं कारण म्हणजे, यात संवाद नाहीत (Silent Film), फक्त अभिनय आणि पार्श्वसंगीतावर संपूर्ण कथा सांगितली जाते. ऑस्कर विजेते संगीतकार ए.आर. रेहमान यांचं संगीत ‘गांधी टॉक्स’ सिनेमाला लाभलं आहे. याबद्दल अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भावना व्यक्त केल्या आहेत.
प्रियदर्शिनी इंदलकरने Red FM ला दिलेल्या मुलाखतीत ए.आर. रेहमान यांचा किस्सा सांगितला आहे. अभिनेत्री म्हणाली, “एका मराठी दिग्दर्शकाने या लेव्हलचा सिनेमा बनवलाय…की आता तुम्ही सगळे पाहू शकता ‘गांधी टॉक्स’ पॅन इंडिया रिलीज झालाय. हा सिनेमा कोणत्याही भाषेत अडकणारा नाहीये…ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मराठी माणूस म्हणून ही गोष्ट आपण सेलिब्रेट केली पाहिजे. मला खूप अभिमान वाटतो की, ‘गांधी टॉक्स’चे लेखक, दिग्दर्शक आणि मेकर आपले किशोर बेलेकर सर आहेत, जे मराठी आहेत.”
अभिनेत्री पुढे म्हणाली, “ए. आर. रेहमानसारख्या खूप मोठ्या संगीतकाराने किशोर सरांवर विश्वास दाखवला. विजय सेथुपतीसारख्या दमदार कलाकारांनी दिग्दर्शकावर विश्वास ठेवून या स्क्रिप्टला होकार दिला. याचा एका किस्सा सांगते, जो किशोर सरांनी रिलीज दरम्यान सांगितला होता. ए. आर. रेहमान आणि किशोर सर यांच्यात आधी कोणताही लेखी करार झाला नव्हता. त्यांनी फक्त गोष्ट ऐकवली होती. तेव्हा किशोर सरांकडे पैसे नव्हते…त्यामुळे त्यांनी रेहमान सरांना विचारलं, आता माझ्याकडे पैसे नाहीयेत…मी तुमच्या नावाने निर्मात्यांकडे पैशांसाठी विचारणा करेन हे तुम्हाला चालेल का? तसं मी तुम्हाला गृहीत धरू का?”
ए.आर. रेहमान सर म्हणाले, मला व्हिडीओ कॉल करा…
“तेव्हा विजय सेथुपती आणि ए.आर. रेहमान या दोघांनी किशोर सरांना होकार दिला होता. या दोघांच्या होकारामुळे किशोर सरांकडे निर्माते आले, फायनान्सर्स आले आणि हा संपूर्ण सिनेमा उभा राहिला. हळुहळू प्रोजेक्ट सुरू झाला…पण, अर्थात काही लोकांना सुरुवातीला विश्वास नव्हता की, या सिनेमाला खरंच रेहमान सर पाठिंबा देत आहेत. त्यावेळी मग किशोर सरांनी पुन्हा रहेमान सरांना सांगितलं की, समोरच्या निर्मात्यांना खरंच तुमची संमती आहे की नाही हे जाणून घ्यायचं आहे.”
“त्यावेळी मग रेहमान सर म्हणाले होते…जर एखाद्या निर्मात्याला जाणून घ्यायचं असेल तर मला थेट व्हिडीओ कॉल करा…मी त्या निर्मात्यांशी व्हिडीओ कॉलवर बोलेन. या लेव्हलचा विश्वास या दिग्गजांनी किशोर सरांवर आणि या सिनेमाच्या स्क्रिप्टवर दाखवला.” असं प्रियदर्शिनीने सांगितलं.
