Arbaz Shaikh shares experience of working with Bharat Jadhav: २०१६ ला प्रदर्शित झालेल्या ‘सैराट’ या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या सिनेमात रिंकू राजगुरू व आकाश ठोसर प्रमुख भूमिकेत दिसले होते. नागराज मंजुळे दिग्दर्शित या सिनेमात अरबाज शेखही महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता.

आता अरबाज शेखने एका मुलाखतीत भरत जाधव व सिद्धार्थ जाधव यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत अरबाज म्हणाला, “‘मटका किंग’ या वेब सीरिजमध्ये भरत जाधव यांच्याबरोबर काम केलं. माझा आणि त्यांचा एक सीन होता. मी जास्त मॉनिटर बघत नाही, कारण मला त्यातलं जास्त काही कळत नाही. आपण काम करायला पाहिजे आणि आपलं काम चांगलं झालं पाहिजे, एवढंच कळतं. भरत सर सीनचे शूटिंग करत होते, नागराज सरांनी मला बोलावलं आणि ते म्हणाले बसं इथे, तुला काहीतरी गोष्ट सांगायची आहे. मी भरत सर करत असलेला सीन बघत होतो. त्या सीनमध्ये ते पाण्याचा ग्लास उचलतात, दुसऱ्या टेकला भरत सरांनी १.६ मिनिटांनी पहिल्या टेकला ज्या वेळेला तो पाण्याचा ग्लास उचलला होता, त्याच वेळेला उचलला. तर नागराज सरांनी सांगितलं की हेच कामातील परफेक्शन असतं, हे शिकणं गरजेचं असतं.”

भरत जाधव यांच्याबद्दल अरबाज शेख काय म्हणाला?

पुढे अरबाज म्हणाला, “मग कळायला लागतं की आपण ज्यांच्याबरोबर काम करतो, ही किती मोठे लोक आहेत. ‘साडे माडे तीन’, ‘जत्रा’ असे त्यांचे चित्रपट खूपदा बघायचो, वेड्यासारखे बघायचो. भरत जाधव, सिद्धार्थ जाधव हे लोक आपल्या आजूबाजूला आहेत आणि आपण त्यांच्याबरोबर काम करतोय, हे इतकं भारी वाटतं. ते त्यांच्या कामात इतके परफेक्ट आहेत, त्यामुळे मला त्यांच्याकडून इतक्या गोष्टी शिकायला मिळाल्या.”

अरबाज असेही म्हणाला, “ते माणूस म्हणून इतके भारी आहेत की ते आपल्याला त्यांच्यात सामावून घेतात. त्यांच्याबरोबर सीन करताना अवघडल्यासारखं वाटत नाही. ते खूप गोष्टी सांगतात. भरत सरांबरोबर माझे सीन होते, तर सर मला विचारायचे की तुला सीनबद्दल काय वाटतं. lते मला म्हणाले की तुला जे वाटतंय ते तू कर, त्यामध्ये अजून काय हवं आहे हे मी तुला सांगतो. त्यांनी मला इतकी मदत केली, मला छान वाटतं की आपल्या इंडस्ट्रीमध्ये इतकी चांगली आणि पाठिंबा देणारी माणसं आहेत.”

‘मटका किंग’ ही वेब सीरिज काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाली होती. नागराज मंजुळे दिग्दर्शित या वेब सीरिजमध्ये विजय वर्मा, सई ताम्हणकर, गुलशन ग्रोव्हर, सिद्धार्थ जाधव हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.