Marathi Art Director Nitin Desai Commits Suicide : सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांनी वयाच्या ५८व्या वर्षी एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ‘हम दिल दे चुके सनम’, ‘माचिस’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘जोधा अकबर’ या गाजलेल्या चित्रपटांचे कलादिग्दर्शन त्यांनी केले होते. नितीन देसाईंच्या मालिका आणि चित्रपटांच्या सेटवर बऱ्याचदा आपल्याला भव्य हत्ती पाहायला मिळतात. गणपती बाप्पा हा कलेचे आराध्य दैवत असल्याने त्यांना हत्तींविषयी विशेष आदर होता. याविषयी त्यांनी ‘माझा कट्टा’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “माझ्यासाठी खूप मोठा धक्का…”, कलादिग्दर्शक नितीन देसाईंच्या आत्महत्येवर खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले दु:ख

नितीन देसाई यांनी हत्तींविषयी बोलताना सांगितले होते की, “गणपती बाप्पामुळे मला हत्तींविषयी विशेष आदर आहे. याशिवाय इतिहासाचा अभ्यास करताना मला एक गोष्ट आवर्जून जाणवली ती म्हणजे, आताच्या काळात जसे पैशाला महत्त्व आहे तसे पूर्वीच्या काळात हत्तींना महत्त्व होते. या विशिष्ट राज्याकडे एवढे हत्ती, या मंदिराकडे तेवढे हत्ती… एकंदर हत्तींमुळे एखाद्या माणसाचे महत्त्व वाढायचे. त्यामुळे भारताचे जागतिक पातळीवर पॅरिसमध्ये प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाल्यावर मी हत्तींची कलाकृती साकारली होती.”

हेही वाचा : Nitin Desai Suicide: “नितीन दादाने असं का केलं…” कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येवर अभिजीत पानसेंची प्रतिक्रिया

“पॅरिसमधील एका रेल्वे स्थानकापासून मी संपूर्ण रस्त्यावर एका रात्रीत हत्तींची मांडणी केली होती. जवळपास २४ फुटांचे १२ हत्ती एनडी स्टुडिओमध्ये बनवून मी पॅरिसच्या रस्त्यावर उभे केले होते. इथून ते हत्ती फोल्ड करून माझ्या टीमने पाठवले होते. मी आणि माझी बायको आम्ही दोघांनीही रात्रभर रस्त्यावर उभे राहून त्या हत्तींची व्यवस्थित मांडणी करून घेतली. रात्री ९ पासून सुरु करून सकाळी ६ वाजता सगळी तयारी पूर्ण झाली. अशा अनेक प्रसंगांमुळे माझ्या मनात हत्तींबद्दल प्रचंड क्रेझ आहे” तसेच माझ्या कलेला हत्तींनीच आशीर्वाद दिला असल्याचे नितीन देसाई यांनी सांगितले होते.

हेही वाचा : ‘मिट्टीसे जुडे हैं..’, ही ठरली कला दिग्दर्शक नितीन देसाईंची शेवटची फेसबुक पोस्ट

दरम्यान, नितीन देसाई यांच्या आत्महत्येमुळे सगळ्याच कलाकारांना धक्का बसला आहे. त्यांना कलाक्षेत्रातील कामगिरीसाठी सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्याशिवाय, त्यांना फिल्म फेअर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Art director nitin desai erected 12 elephants in one night on the street of paris sva 00