Cannes 2026 Marathi Actors Red Carpet Look : ७९ व्या ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ची सुरुवात १२ मे पासून झालेली आहे. यंदा या सोहळ्याला बॉलीवूडसह अनेक मराठी कलाकारांनी देखील उपस्थिती लावल्याचं पाहायला मिळत आहे. Cannes च्या रेड कार्पेटवर यावर्षी सर्वप्रथम मराठी अभिनेता पुष्कर जोगने उपस्थिती लावली होती. पुष्कर पाठोपाठ आता प्राजक्ता माळी, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावकर ( कोकण हार्टेड गर्ल ) आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिग्ग्ज अभिनेते पद्मश्री अशोक सराफ व त्यांच्या पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी देखील कान्सच्या रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली आहे. या कलाकारांचे मराठमोळ्या लूकमधील व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत.
अशोक व निवेदिता सराफ, प्राजक्ता माळी आणि अंकिता वालावलकर हे चौघंही १७ मे रोजी भारत पव्हेलियनमध्ये उपस्थित होते. यावेळी त्यांनी ‘अभिजात मराठी OTT’चं जागतिक लॉन्च केलं. आपले हे मराठी कलाकार आपल्या मराठी भाषेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी कान्सला पोहोचले आहेत.
निवेदिता व अशोक सराफ यांनी मराठमोळ्या पारंपरिक अंदाजात रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली. हे दोघंही खूपच सुंदर दिसत होते. निवेदिता यांनी पैठणी साडी, त्यावर शेला, केसात गजरा असा पारंपरिक लूक केला होता. या दोघांनी यावेळी हात जोडून ‘नमस्कार’ करत सर्वांना अभिवादन केलं. तर, प्राजक्ता माळीने मोरपिशी रंगाची नऊवारी साडी, गळ्यात ठुशी, व्ही-नेक ब्लाऊज, कमरपट्टा, कपाळी चंद्रकोर अशा रॉयल अंदाजात रेड कार्पेटवर पोझ दिल्याचं पाहायला मिळालं.
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकरने गुलाबी रंगाची सुंदर साडी नेसून यावर मोत्याची ज्वेलरी परिधान केली होती. विशेष म्हणजे अंकिताच्या साडीच्या शेल्यावर एक खास डिझाइन रेखाटण्यात आलं होतं. नारळाची झाडं, बेट, उडणारे पक्षी या डिझाइनमध्ये पाहायला मिळत आहेत. यामध्ये अंकिताने आपल्या ‘कोस्टल कोकण’ची झलक ‘कान्स’च्या रेड कार्पेट लूकद्वारे सर्वांना दाखवली आहे. त्यामुळे या कोकणच्या चेडूचं सर्वत्र भरभरून कौतुक करण्यात येत आहे.
या चौघांच्या लूकवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. महाराष्ट्रासह मराठी भाषेसाठी हा ऐतिहासिक क्षण असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, या ग्रँड कान्स सोहळ्याची सांगता २३ मे रोजी होईल. गेल्या काही दिवसांत या मराठी कलाकारांसह आलिया भट्ट, अदिती राव हैदरी, हुमा कुरेशी असे सगळेच कलाकार रेड कार्पेटवर उपस्थित राहिल्याचं पाहायला मिळालं. मात्र, सर्वांचं लक्ष आहे ऐश्वर्या राय बच्चनकडे… यावर्षी ‘कान्सची क्वीन’ ऐश्वर्या राय या कार्यक्रमाच्या क्लोझिंग सेरेमनीला उपस्थित राहणार असल्याचं बोललं जात आहे.
