Ashok And Nivedita Saraf Son Aniket Saraf : मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन अन् आदर्श जोडी म्हणून अशोक व निवेदिता सराफ यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. गेली अनेक दशकं या दोघांनी मराठी मनोरंजन विश्वावर अधिराज्य गाजवलं आहे. यांच्या एकुलत्या एक मुलाचं नाव आहे अनिकेत सराफ. नुकताच तो आपल्या आई-बाबांचं कौतुक करण्यासाठी कान्सला पोहोचला होता. अनिकेत सराफ भारतात राहत नाही. त्याच्या प्रोफेशनमुळे तो परदेशात असतो. आपल्या लेकाबद्दल आणि त्याच्या प्रोफेशनबद्दल निवेदिता यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
निवेदिता सराफ ‘सर्वकाही’ या पॉडकास्टमध्ये म्हणाल्या, “आमचा मुलगा Oxford मध्ये इंग्रजी शिकवतो. आम्ही दोघांनी कधीच त्याला तू हे कर किंवा ते कर असं सांगितलं नाही. खरंतर तो शेफ आहे, याशिवाय तो उत्तम लिहितो. छान कविता करतो. काही वर्षांपूर्वी तो जेव्हा कॅनडात होता, त्यावेळी नेमकं लॉकडाऊन सुरू झालं आणि दुर्दैवाने त्याची नोकरी गेली. आम्ही त्याला परत भारतात ये असं तेव्हा सांगत होतो, पण त्याला परत यायचं नव्हतं. मग आता करायचं…असं सगळं आमचं सुरू होतं. अनिकेत खूप छान Accent करतो. मग ते अमेरिकन accent असो किंवा ब्रिटीश…ते त्याला फार छान जमायचं. लॉकडाऊन सुरू झाल्यावर तिथे राहण्यासाठी काहीतरी मार्ग पाहिजे, मग त्याने Accent कोच म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. यानंतर त्याने एक सेल्टा नावाची परीक्षा दिली. आता सध्या तो Oxford इंग्लिश सर्कलमध्ये आहे.”
अभिनेत्री पुढे म्हणाल्या, “लॉकडाऊन संपल्यावर हॉटेल इंडस्ट्री पुन्हा एकदा हळुहळू सुरू होऊ लागली. तेव्हा त्याला जाणवलं की शेफ प्रोफेशनपेक्षा इंग्रजीच्या टिचिंग प्रोफेशनमध्ये त्याला व्यवस्थित पेमेंट वगैरे मिळतंय. सुरुवातीला तो टोरंटोला शिकवत होता मग, तो Oxford ला गेला. आता तो Oxford मध्ये आहे आणि तिथे तो प्रशासकीय जबाबदारीही सांभाळतो.”
“आम्हाला दोघांनाही कधीच परदेशात राहण्याची हौस नव्हती. कारण, आमची कर्मभूमी, जन्मभूमी हीच आहे. पण, त्याला मनापासून तिथे जायचं होतं…त्याला तिथे राहायचं होतं. त्यामुळे आम्हाला त्याला थांबवायचं सुद्धा नव्हतं. माझ्यासाठी हे खूप कठीण होतं कारण, मी माझ्या मुलाला माझ्यापासून दूर पुण्याला सुद्धा पाठवलं नव्हतं. एअरपोर्टवर जेव्हा त्याला सोडायला जाते…तेव्हा खरंच ‘बाय-बाय’ बोलताना मला काय वाटतं हे मी सांगू शकत नाही. माझं मन खरंच खूप भरून येतं.” असं निवेदिता यांनी सांगितलं.
