Ashok Samarth and Suhas Shirsat on Raja Shivaji: प्रत्येक सिनेमात काम करण्याचा, प्रत्येक भूमिका साकारण्याचा अनुभव वेगळा असतो. कलाकार त्या-त्या कालावधीत त्या-त्या भूमिका जगत असतात. स्वभावाच्या विविध छटा असलेल्या, कधी काल्पनिक, ऐतिहासिक अशा वेगवेगळ्या भूमिका कलाकार साकारत असतात.
काही दिवसांपूर्वी ‘राजा शिवाजी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमात अनेक कलाकारांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. आता कलाकार सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांचा चित्रपटात काम करण्याचा अनुभव शेअर करत आहेत.
“कान्होजी जेधे साकारण्याची जबाबदारी…”
अभिनेते अशोक समर्थ यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी एक फोटो शेअर करत लिहिले, “एखादं स्वप्न पाहणं, ते फुलवणं आणि ते सत्य सृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवाने ते स्वप्न भंग पावलं तरी त्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पावलांनी स्वप्नांच्या मागे धावणं हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो, तो यामुळेच.”
पुढे त्यांनी लिहिले, “‘राजा शिवाजी’ या चित्रपटाची संपूर्ण धुरा सांभाळलेल्या रितेशजी देशमुख यांना आणि सहचारिणी जिनिलीया देशमुख यांना वि. स. खांडेकरांचं हे वाक्य लागू होतं. खरोखर झपाटलेपणाने रितेशजींनी या स्वप्नांचा पिच्छा पुरवला आणि त्याला आपल्या कवेत सामावून घेतलं, त्याला कुरवाळलं, त्याला जोपासलं आणि आज आपल्या समोर आणलं. सरजी तुमचं मनापासून अभिनंदन आणि अभिवादन. अत्यंत महत्त्वाचं पात्रं म्हणून कान्होजी जेधे साकारण्याची जबाबदारी आपण माझ्यावर सोपवली आणि आज देशाच्या कानाकोपऱ्यातून चित्रपटाबरोबर प्रेक्षकांनी मलासुद्धा स्वीकारल्याची पोच पावती रसिक मला देत आहेत, याचा खरंच मला विलक्षण आनंद होतोय.”
शेवटी त्यांनी लिहिले, “छत्रपतींसारख्या महापुरुषाला मिठी मारण्याचा आनंद मला तुमच्या रूपाने मिळाला. खरंतर हे वाक्य वाचायला ऐकायला इतरांना वेगळं वाटेल, पण ही भावना माझी आहे. रितेशजी मनापासून तुमचे आभार आणि धन्यवाद!”
याबरोबरच, अभिनेते सुहास शिरसाट यांनीदेखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मनातील भावना व्यक्त केल्या. त्यांनी लिहिले, “‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचा भाग असणं माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे, कारण आपलं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. मी रितेश सरांचा खूप खूप आभारी आहे. रितेश सर मला ही संधी दिल्याबद्दल खूप आभार आणि डॉ. अजित वाडीकर तुमचेही आभार,” असे लिहित भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत त्यांचे कौतुक केले आहे.
एकाने लिहिले, “अभिनंदन”, दुसऱ्या एकाने लिहिले, “खलनायकाची भूमिका खूप छान साकारली आहे”, एकाने लिहिले, “तुम्ही खूप चांगला अभिनय केला”, एकाने लिहिले, “पाटील”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, सुहास शिरसाट सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘सनई चौघडे’ या मालिकेत काम करत आहेत; तर ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने सात दिवसांत ५७.७ कोटींची कमाई केली आहे.
