९० च्या दशकात अशोक सराफ, सचिन पिळगांवकर व लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एकापेक्षा एक सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. तेव्हापासून असलेल्या त्यांच्या मैत्रीची ऊब अजूनही कायम आहे. या त्रिकुटामधील लक्ष्मीकांत बेर्डे आज आपल्यात नाहीत; पण सचिन पिळगांवकर व अशोक सराफ हे आजही एकमेकांचे घनिष्ठ मित्र आहेत. दोघांनी अनेक चित्रपटांमधून काम करीत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
अशोक सराफ आणि सचिन पिळगांवकर हे कलाकार त्यांच्या समकालीन कलाकारांसह नंतरच्या पिढीसाठीसुद्धा एक आदर्श आहेत. त्यांनी अनेक नव्या कलाकारांबरोबर काम केलं. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेते विकास समुद्रे. विकास समुद्रे यांनी ‘कॉमेडी एक्स्प्रेस’, ‘फु बाई फु’ यांसारख्या विनोदी शोमध्ये काम केले आहे, तसेच ते काही सिनेमांमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. विकास यांनी अशोक सराफ आणि सचिन पिळगांवकर यांच्याबरोबर काही सिनेमांत काम केले आहे.
अशाच एका सिनेमात अशोक सराफ आणि सचिन पिळगांवकर विकास यांच्यावर चिडलेले. त्याचा किस्सा अभिनेत्याने शेअर केला आहे. ‘अभिजात मराठी फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा किस्सा शेअर केला.
विकास यांनी सांगितलं, “मी सचिन पिळगांवकर आणि अशोक सराफ यांच्याबरोबर ‘अदलाबदली’ सिनेमात काम केलं आहे. त्यादरम्यानच्या काळात माझी आई वारली होती. त्यामुळे मी खूप दु:खी होतो. त्या चित्रपटाचे शूटिंग जुहूमधील एका बंगल्यात होतं; तर मी एका खोलीत एकटाच बसलो होतो. त्यावेळी सचिन आणि अशोकसर मला भेटायला आले होते. आई गेल्याचं त्यांना कळलं होतं. त्यासाठी ते सांत्वन करायला आले होते. त्यांनी विचारपूस वगैरे केली. घरी सगळं ठीक आहे का वगैरे विचारलं.”
पुढे त्यांनी सांगितलं, “त्याच्याच पुढच्या एका शॉटमध्ये अशोक सराफसर खाली झोपले होते आणि मला त्यांना काहीतरी द्यायचं आहे, असा सीन होता. माझ्या बाजूला सचिन पिळगांवकर होते. वरून कॅमेरा लागलेला होता. त्या वेळेस मी सचिनसरांना पटकन बोलून गेलो की, “बघा इतका मोठा माणूस (अशोक सराफ) तरी ‘डाऊन टू अर्थ’ आहे.” त्यावर ते दोघे माझ्यावर वैतागले आणि “तुझी परिस्थिती काय आहे आणि तू काय ‘डाऊन टू अर्थ’सारखे जोक काय करतोयस”, असं म्हटलेलं.”
पुढे विकासनं आणखी एक किस्सा सांगितला, तो म्हणाला, “नंतर अशोक सराफ यांच्याबरोबर एका सिनेमात माझी अशी भूमिका होती, ज्यात मी त्यांचा ड्रायव्हर असतो. मॅनेजर असतो. स्वयंपाकीसुद्धा असतो. एका सीनमध्ये मी त्यांना स्प्रिंग ओनियन आणून देतो आणि “हे घ्या तुमचं स्प्रिंग ओनियन. लागलं, तर सांगा आणखी आणीन”, असा छोटासा विनोद केला. त्यावर अशोकमामा माझ्यावर, “अरे जा रे… याला इकडून हाकला रे…”, असं म्हणत फार बरसलेले. मग मी म्हणलो, “मामा हे काय सीनमध्ये येणार नाहीय. मी सहजच बोललो.” त्यावर ते पुन्हा चिडून “काही बोलू नकोस”, असं म्हणालेले.” अर्थात हे सगळं गमतीत घडलं होतं.
पुढे विकास यांनी अशोक सराफ यांचं कौतुक करत म्हटलं, “त्यांच्याबरोबर मी तीन चित्रपटांत काम केलं आहे. पण असे किस्से अनेक आहेत, जे कुठल्या मुलाखत किंवा मासिकात पाहायला आणि ऐकायला मिळणार नाहीत. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं आहे. ते माझ्यासाठी पूज्यनीय आहेत.” दरम्यान, २०१८ मध्ये विकास समुद्रे यांना ब्रेन हॅमरेज झालं होतं. त्यामुळे त्यांनी काही काळासाठी ब्रेक घेतला होता. पण, ते आता लवकरच काही सिनेमा आणि नाटकांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
