Ashok Saraf Nickname Story: सिनेसृष्टीत काम करणाऱ्या अनेक कलाकारांना टोपणनावाने ओळखले जाते. जसे राजेश खन्नांना काका या नावाने संबोधले जात होते. अमिताभ बच्चन यांना बिग बी या नावानेही ओळखले जाते. याबरोबरच, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना मामा असेही संबोधले जाते. एका मुलाखतीत अशोक सराफ यांनी त्यांना सर्वांत पहिल्यांदा मामा असे कोणी संबोधले याबद्दल सांगितले होते.
“इंडस्ट्रीमध्ये मला पहिल्यांदा मामा म्हणणारे…”
‘डीडी सह्याद्री’ला दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ यांनी याबाबत खुलासा केला होता. त्यांना या मुलाखतीत विचारले होते की, तुम्हाला सगळेजण मामा कसे म्हणायला लागले? पहिल्यांदा मामा म्हणून कोणी हाक मारली? या प्रश्नाचे उत्तर देत अशोक सराफ म्हणालेले, “खरं सांगू का, माझे जे समवयस्क होते किंवा माझ्यापेक्षा मोठे होते ते मला अशोक म्हणायचे. माझ्यानंतर जे लोक इंडस्ट्रीमध्ये आले, त्यांना मला काय म्हणून हाक मारायची ही समस्या होती. अशोक म्हणू शकत नव्हते, अशोक जी म्हणणं त्यांना लांबचं वाटत होतं, अशोक साहेब त्यापेक्षा परकं वाटत होतं; तर त्यांचा नेहमी प्रॉब्लेम असायचा की काय म्हणावं.”
ते पुढे म्हणालेले, “इंडस्ट्रीमध्ये मला पहिल्यांदा मामा म्हणणारे असे दोन कलाकार आहेत. एक म्हणजे प्रिया बेर्डे आहे. प्रियाची आई लता आणि मी नाटकात एकत्र काम करायचो. त्या मला भाऊच मानायच्या. प्रिया तेव्हा लहान होती. तेव्हापासून ती मामा मामा म्हणत माझ्यामागे फिरायची, त्यामुळे मला मामा म्हणणारी ओरिजनल ती आहे.”
दुसरी व्यक्ती कोण आहे हे सांगत अशोक सराफ म्हणालेले, “दुसरा म्हणजे दिपक देऊळकर हा आहे. कारण दिपक देऊळकरची आईसुद्धा मला भाऊच मानायची. त्याची आई, मावशी, आमचा खूप घरोबा होता, त्यामुळे तोही मला मामा म्हणायचा, त्यामुळे ओरिजनल मामा म्हणणारे हे दोघे आहेत.”
“…त्यानंतर मी मामा म्हणून प्रसिद्ध झालो”
पुढे ते म्हणालेले, “प्रकाश शिंदे म्हणून कॅमेरामन आमच्याकडे होता. एकदा शूटिंगदरम्यान तो लहान मुलीला घेऊन आला आणि तिला म्हणाला की हे बघ हे कोण आहेत, अशोक मामा आहेत. तो दररोज मुलीला आणायचा आणि मुलीला हे अशोक मामा आहेत असं सांगायचा. हळूहळू त्यानेच मला अशोक मामा म्हणायला सुरुवात केली. त्याने मामा म्हणायला सुरुवात केल्यानंतर सगळ्यांना प्रश्न पडतच होता की मला काय म्हणून हाक मारायची आहे, तर सगळ्यांनी मला मामा म्हणायला सुरुवात केली. सगळीकडे मला मामा म्हणायला लागले. त्यानंतर मी मामा म्हणून प्रसिद्ध झालो.”
ते असेही म्हणालेले, “या सगळ्यात मी दोन-तीन भूमिका अशा केल्या की त्यात मी मामा होतो, त्यामुळे मामा हे नाव लोकप्रिय झालं. रस्त्यावर जर शूटिंग असेल, तिथल्या गर्दीत लोक जे उभे असत, तेसुद्धा मला काय अशोक मामा बरंय ना, असे विचारत असत,” अशी अशोक सराफ यांनी आठवण सांगितली होती.
