मराठी कलाविश्वातील लोकप्रिय व दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ या वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आज ( २२ फेब्रुवारी २०२४ ) मुख्यमंत्र्याच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मुंबईतील वरळी येथे पार पडलेल्या ५७ व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र भूषण स्वीकारल्यानंतर अशोक सराफ यांनी रंगमंचावर आपलं मनोगत व्यक्त केलं.

महाराष्ट्र भूषण अशोक सराफ म्हणाले, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, दिपक केसकर, मनिषा कायंदे या सगळ्यांना मी अभिवादन करतो. महाराष्ट्रातील सर्वात मोठा व एक नंबरचा पुरस्कार आज तुम्ही मला प्रदान केलात याचा मला सर्वाधिक आनंद होत आहे. ज्या महाराष्ट्रात मी जन्मलो, जी माझी कर्मभूमी आहे आणि याठिकाणीच आज माझा सत्कार व्हावा यासारखी मोठी गोष्ट दुसरी कुठलीच नाही. महाराष्ट्र शासनाचे यासाठी मी मनापासून अभिवादन करतो. कारण, याआधी ज्या लोकांना हा पुरस्कार प्राप्त झालाय ती यादी एवढ्या मोठ्या लोकांची आहे की, त्यात मला नेऊन बसवलं ही माझ्यासाठी कधीही न विसरण्यासारखी गोष्ट आहे.”

हेही वाचा : अशोक सराफ : रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या ‘विनोदाच्या सम्राटा’ला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण

आपल्या चित्रपट क्षेत्रातील प्रवासाबद्दल सांगताना अशोक सराफ म्हणाले, “आता एकंदर माझ्या प्रवासाबद्दल सांगायचं झालं, तर जवळपास ५० वर्षांची संपूर्ण कारकीर्द आहे. आता खरंतर सगळं आठवतही नाही. पण, या संपूर्ण प्रवासात ज्यांनी ज्यांनी मला मदत केली. मग ते दिग्दर्शक असो किंवा माझ्याबरोबर काम करणारे लहान लहान कामगार, तंत्रज्ञ कोणीही असूद्या… या सगळ्यांनी मला कळत नकळत नेहमीच मदत केली. त्यांनी मला सतत पाठिंबा दिला नसता, तर मी आज या पदाला पोहोचलो नसतो. सगळ्यात शेवटी तुम्ही… म्हणजे माझा प्रेक्षकवर्ग. या महाराष्ट्राला लाभलेला प्रेक्षकवर्ग अतिशय बुद्धिमान आहे. आवडलं तर डोक्यावर घेणारा नाहीतर तुम्हाला विचारणार सुद्धा नाही. त्यामुळे अशा लोकांमध्ये काम करणं ही तारेवरची कसरत आहे. आपण प्रेक्षकांसमोर काहीही सादर करू शकत नाही. नेहमी सादरीकरण करताना आम्हाला प्रत्येक गोष्टीचं भान ठेवावं लागतं.”

हेही वाचा : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी पत्नीसह पोहोचले अशोक सराफ; निवेदिता म्हणाल्या, “माझ्या माहेरचे-सासरचे सगळेजण…”

“ही खरंतर चांगली गोष्ट आहे कारण, आपलं काम हे समोर बसलेल्या लोकांना आवडलं पाहिजे हा दृष्टीकोन नेहमी प्रत्येकाने बाळगला पाहिजे. मी सतत तोच दृष्टीकोन घेऊन काम करत आलो आहे. कारण, कलाकारासाठी प्रेक्षक हा सर्वात श्रेष्ठ असतो. जर दाद द्यायला तुम्ही नाही आलात, तर आम्ही काय करणार? मग, आम्ही घरीच…त्यामुळे तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. तुमचे हे उपकार मी कधी फेडेन याबद्दल मला काहीच माहिती नाही. किंबहुना तुमचे हे उपकार मी फेडू देखील शकणार नाही. पण, माझ्या मनात तुमच्याबद्दलचं प्रेम सतत राहणार याबद्दल मला जराही शंका वाटत नाही. तुम्ही माझा एवढा मोठा सत्कार केलात त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद!” असं मनोगत अशोक सराफ यांनी व्यक्त केलं.