गेल्या अनेक दशकांपासून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अशोक सराफ आता एका नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याबरोबर या चित्रपटात अष्टपैलू आणि आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक असलेला संकर्षण कऱ्हाडेही प्रमुख भूमिकेत झळणार आहे.
संकर्षण कऱ्हाडेने पोस्ट शेअर करत या चित्रपटाबद्दलची माहिती शेअर केली आहे. समोर आलेल्या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये अशोक सराफ व संकर्षण यांचं चित्रपटात एकमेकांशी असलेल्या भावनिक नात्याची झलक दिसत आहे. पोस्टला मोठी कॅप्शन देत अभिनेत्याने याबद्दलची माहिती देत हा त्याने लिहिलेला पहिला सिनेमा असल्याचं सांगितलं आहे.
अशोक सराफ व संकर्षण कऱ्हाडे झळकणार एकत्र
“विनामुल्य मिळालेली नाती फार मोलाची असतात” अशी टॅगलाइन असलेल्या या चित्रपटाचं नाव ‘आदि अनंत’ असं आहे. लोकप्रिय सिनेमॅटोग्राफर महेश लिमये यांनीच या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली असून त्यांनीच या चित्रपटाचं छायाचित्रणही केलं आहे. महेश लिमये दिग्दर्शित आणि संकर्षण कऱ्हाडे लिखित हा चित्रपट येत्या १२ नोव्हेंबरपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. समोर आलेल्या पोस्टरनुसार संकर्षण व अशोक सराफ या चित्रपटात वडील-मुलाच्या भूमकेत झळकणार असून फारशा न बोलल्या जाणाऱ्या पण संवेदनशील विषयावर चित्रपट आधारित असल्याचं दिसतं.
संकर्षणने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत कॅप्सनमधून म्हटलं की, “‘आदि अनंत’. आपण सगळ्यांनी आयुष्यात अनुभवलेल्या नात्यावर आम्ही चित्रपट केलाय आदि अनंत. देवाला नमस्कार करून हे पहिलं पोस्टर आपल्या सगळ्यांसाठी. कसं वाटलं? प्लीज नक्की सांगा. मी लिहिलेला पहिला सिनेमा. अशोक सराफ सरांसोबत माझा पाहिला सिनेमा. नात्यातली सगळ्यात सुंदर गोष्ट सहवास जो नशिबात असल्याशिवाय मिळत नाही आणि सगळ्यात त्रास देणारी गोष्ट पश्चात्ताप जो झाल्याशिवाय रहात नाही. आपल्या माणसांच्या कुशीत डोकं ठेवून शांत पडून रहाण्यासारखं मेडिटेशन नाही ; आणि प्रेमाच्या मिठीने शांत होणार नाही अशी कोणतीही जनरेशन नाही. प्रत्येक पिढीतल्या प्रत्येकाची धमाल कमाल आणि प्रेमळ गोष्ट आदि अनंत… नक्की पहा . १२ नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या आणि लांबच्या चित्रपटगृहात.”
