Sankarshan Karhade Jejuri Movie Poster Launch : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ व अष्टपैलू अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांच्या आगामी ‘आदि अनंत’ सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. यावेळी कोणत्याही थिएटरमध्ये नाही तर थेट महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाचा आशीर्वाद घेत जेजुरी गडावर सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

संकर्षण कऱ्हाडेने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करीत ‘आदि अनंत’ सिनेमाचे पोस्टर जेजुरीवर रिलीज केल्याचे शेअर केले. यावेळी संकर्षणसह महेश लिमये आणि‘आदि अनंत’च्या टीमने पायी जेजुरी गड चढून मल्हारी मार्तंडाचे दर्शन घेतले. पहिल्या पायरीवर डोके टेकवून, त्यांनी गडाच्या पायऱ्या सर केल्या. यावेळी संकर्षणला अनेक चाहते भेटल्याचे दिसून आले. ‘आदि अनंत’च्या टीमने भंडारा उधळीत नव्या सिनेमाच्या यशासाठी आशीर्वाद घेतले.

‘आदि अनंत’ सिनेमाचे पोस्टर जेजुरीवर प्रदर्शित

याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करीत संकर्षणने लिहिले की, पहिलं पोस्टर कुणाच्या पायावर ठेवावं, असा विचार केला आणि आम्ही थेट ‘सोन्याची जेजुरी’ गाठली… खंडेरायाच्या पायांवर डोकं ठेवलं, भंडारा उधळला आणि ‘आदि अनंत’च्या यशस्वी प्रवासासाठी प्रार्थना केली… येळकोट येळकोट जय मल्हार… !!

पुढे संकर्षणने लिहिले, “आता आम्ही तयार आहोत १२ नोव्हेंबरपासून प्रत्येक घराची आणि घरातल्या नात्यांची गोष्ट तुम्हाला तुमच्या जवळच्या आणि लांबच्या चित्रपटगृहात दाखवायला… १२ नोव्हेंबरपासून नक्की या भेटायला.”

दरम्यान, अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे हे पहिल्यांदाच ‘आदि अनंत’ या मराठी चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. त्याचे दिग्दर्शन महेश लिमये यांनी केले असून, पहिल्यांदाच संकर्षण कऱ्हाडेने सिनेमासाठी लेखन केले आहे. त्याचबरोबर सखी गोखलेही आदि अनंत या सिनेमामध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. १२ नोव्हेंबरपासून हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.