सचिन पिळगांवकर निर्मिती आणि दिग्दर्शित ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. आजपासून चित्रपटगृहात ‘नवरा माझा नवसाचा २’ प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, स्वप्निल जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत अशी तगडी कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहे. याच निमित्ताने चित्रपटाची टीम विविध एंटरटेनमेंट चॅनेलशी संवाद साधताना दिसत आहे. याच वेळी अशोक सराफ यांनी रेल्वेतील एक प्रसंग सांगितला. ज्यामुळे त्यांना एक धडा मिळाला.
नुकताच ‘प्लॅनेट मराठी’ या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाच्या टीमने संवाद साधला. यावेळी अशोक सराफ यांना रेल्वेच्या प्रवासातील एखादी आठवण विचारली. तेव्हा अशोक सराफ यांनी मुंबई ते कोल्हापूर असा प्रवास करत असताना घडलेला प्रसंग सांगितला.
हेही वाचा – Video: अभिजीत सावंतला साडी नेसवून केला भन्नाट मेकअप, अरबाज म्हणाला, “छम्मक छल्लो”
हेही वाचा – सई ताम्हणकरला आवडला ‘बिग बॉस मराठी’तील ‘या’ सदस्याचा स्वभाव, निक्की तांबोळीचा उल्लेख करत म्हणाली…
अशोक सराफ म्हणाले, “मला एकदा थर्ड क्लासचं तिकीट दिलं होतं. मुंबईवरून कोल्हापूरला जायचं होतं. त्यामुळे कशाला टू-टियर आणि एसी पाहिजे, असं मत होतं. त्यामुळे मी थर्ड क्लासमधून जात होतो. आमचं सगळं युनिट बसलं होतं. आम्ही आपापसात गप्पा मारत होतो. समोरच्या सीटवर दोन जण बसले होते. एक जण सारखा माझ्याकडे बघत होता. मी म्हटलं, अरे बापरे याने ओळखलेलं दिसतंय. बऱ्याच वेळ त्या माणसाने बघितल्यानंतर त्याने आपल्या बाजूच्या माणसाला विचारलं, ओळखलंस का यांना…अशोक सराफ… हे सगळं त्याचं मी ऐकत होतो. ‘पांडू हवालदार’ अशा मोठ्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलंय. तेव्हा बाजूचा माणूस म्हणाला, मी यांना केव्हाच ओळखलं. पण नाही वाटतं हे थर्ड क्लासने प्रवास करत असतील. त्याने मला बोलण्यातून कसला लाफा मारला. मी म्हटलं, अरे बापरे हे सगळं विचित्र आहे.”
हेही वाचा – …म्हणून सीमा देव यांनी अभिनय करणं सोडलं होतं, सूनबाई स्मिता देव यांनी सांगितलं कारण
पुढे अशोक सराफ म्हणाले, “म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतः प्रवास करता तेव्हा लोकांमध्ये काय इमेज झाली आहे, याचा तुम्ही विचार केला पाहिजे. तुम्हाला स्वतःला जरी वाटतं असेल काय होतंय. तेव्हा लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे विचारत घेतलं पाहिजे. लगेच मी कोल्हापूरला पोहोचल्यावर म्हटलं, मी यापुढे फर्स्ट क्लासने येणार आणि जाणार हां. थर्ड क्लास विसरा. मला ते करावं लागलं. लोक अशी किंमत करायला लागले, तर गेलंच ना कामातून. आपली इमेज स्वतः जपावी लागते ती कधी कधी अशी…हा धडा मी इतका मस्त शिकलो आहे.”