Ashvini Bhave : मराठीसह हिंदी कलाविश्वात आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून अश्विनी भावे यांना ओळखलं जातं. ‘शाब्बास सुनबाई’, ‘अशी ही बनवा बनवी’, ‘कळत नकळत’ ते अलीकडेच प्रदर्शित झालेला ‘घरत गणपती’ अशा गाजलेल्या सिनेमांमध्ये अश्विनी भावेंनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. “लिंबू कलरची साडी…” हा डायलॉग जरी म्हटला तरी प्रत्येकाला त्यांची आठवण येते. रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या अभिनेत्रीने करिअरच्या शिखरावर असताना लग्न केलं. त्या अमेरिकेत स्थायिक आहेत. मात्र, चित्रपटांच्या शूटिंगनिमित्त आणि अनेकदा सणवाराला अश्विनी भावे भारतात येतात.

अश्विनी भावे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत. अमेरिकेतील त्यांचं घर, त्यांच्या घराजवळची बाग या सगळ्याची झलक त्यांनी चाहत्यांना व्हिडीओच्या माध्यमातून दाखवली आहे. आता अश्विनी भावेंनी नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सर्वत्र चर्चेत आला आहे. २२ एप्रिलला ‘Earth Day’ साजरा केला जातो. यानिमित्ताने त्यांनी हा खास व्हिडीओ शेअर केला आहे.

अमेरिकेहून भारतात परतल्यावर अश्विनी भावे सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गावी गेल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. हिरव्यागार शेतात त्या मनसोक्त फेरफटका मारताना दिसत आहेत. याशिवाय शेतात काम करणारे बैल, पाळीव शेळ्या, सध्या येणारं पीक या सगळ्याची माहिती त्यांनी शेतकऱ्यांकडून घेतली आहे. दुसऱ्या एका क्लिपमध्ये अश्विनी भावे स्वत: ऊसाचा रस बनवत असल्याचं आणि चिंच खात असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच त्यांनी वडाच्या झाडाच्या पारंब्यावर झोका सुद्धा घेतला. या व्हिडीओला अभिनेत्रीने “मन रानात गेलं गं…” हे गाणं बॅकग्राऊंडला जोडलं आहे.

या व्हिडीओमध्ये अश्विनी भावेंनी शेवटी चक्क ट्रॅक्टर चालवतानाचा फोटो शेअर केला आहे. अभिनेत्रीचा हा साधेपणा पाहून चाहते सुद्धा भारावले आहेत. मराठी कलाकारांसह चाहत्यांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

“किती गोड व्हिडीओ आहे”, “आमची आवडती अभिनेत्री अगदी सरळ साधा स्वभाव… व्हिडीओ सुंदर आहे”, “किती छान मिळून मिसळून राहता”, “सुंदर…. असं प्रत्येकाने जगलं पाहिजे”, “हे असतं खरं सुख सुंदर व्हिडीओ मॅडम” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.