दिग्दर्शक केदार शिंदे यांचा ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे मिळत आहे. आता ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट कसा वाटला याबद्दल विविध प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. नुकतंच मराठी अभिनेत्री अश्विनी भावेंनी चित्रपटाच्या यशाबद्दल बाईपण भारी देवा’च्या स्टार कास्टला कॅलिफोर्नियातून शुभेच्छा दिल्या आहेत.
अश्विनी भावे सध्या कॅलिफोर्नियामध्ये स्थायिक आहेत. तिथे त्यांनी काही मराठी प्रेक्षकांबरोबर हा चित्रपट पाहिला. अश्विनींना हा चित्रपट खूप आवडला. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत त्यांनी चित्रपटातील कलाकारांच कौतुक केलं आहे. जोश स्टुडिओ मराठीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये अश्विनी चित्रपटातील कलाकारांच कौतुक करताना दिसत आहेत. तसंच त्यांनी चित्रपटाचे टायटल गाणेही गायले आहे.
दरम्यान केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट शुक्रवारी ३० जूनला प्रदर्शित झाला. ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचं कथानक महिलांभोवती फिरणारं असलं तरी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक पुरुषालाही हा चित्रपट बरंच काही सांगून जाणार आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा चौधरी या अभिनेत्री मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. त्याबरोबरच अभिनेते शरद पोंक्षे, पियुष रानडे यांच्याही या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत.
दरम्यान हा चित्रपट चित्रपटगृहात चांगली कमाई करताना दिसत आहे. ‘पिंकविला’च्या वृत्तानुसार, पहिल्या दिवशी या चित्रपटाने १ कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. शनिवारी या चित्रपटाने २.१० कोटींचा गल्ला जमवला होता. तर तिसऱ्या दिवशी म्हणजेच काल या चित्रपटाने २.८० कोटींचा व्यवसाय केला आहे.
