Ashwini Bhave USA Home Garden : ९० च्या दशकात मराठी चित्रपटांसह बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजेच अश्विनी भावे. आपल्या सहज-सुंदर अभिनयाने त्यांनी कायमच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. सध्या त्या अमेरिकेत वास्तव्याला असतात. फक्त कामानिमित्त त्या भारतात येतात. पण, अमेरिकेत असूनही त्यांचं मराठी कलाविश्वाशी आजही तेवढंच घट्ट नातं आहे. काही दिवसांपूर्वीच अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी काही नामवंत मराठी कलाकार गेले होते. आता पुन्हा एकदा त्यांचं घर आणि विशेषत: त्यांनी घराजवळ फुलवलेली बाग पाहण्यासाठी ‘असेन मी नसेन मी’ नाटकाची टीम त्यांच्या घरी गेली होती. ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना अश्विनी भावेंचं ‘The Green Door’ पाहायचं होतं.

अश्विनी भावेंनी एक छानसा व्हिडीओ शेअर करत याची झलक चाहत्यांना दाखवली आहे. लाडक्या मैत्रिणी घरी येणार म्हणून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. अश्विनी यांनी अमृता सुभाष, नीना कुलकर्णी आणि त्यांच्या नाटकाच्या संपूर्ण टीमला त्यांच्या घरच्या बागेची झलक दाखवली. बागेतील काकडी, फळभाज्या, स्वीट टोमॅटो दाखवले. अश्विनी भावेंनी गार्डनिंगसाठी घेतलेली मेहनत, ताज्या भाज्यांची लागवड या गोष्टी पाहून सगळेच भारावून गेले होते. नेटकऱ्यांनी सुद्धा अभिनेत्रीचं कौतुक केलं आहे.

अश्विनी भावे सांगतात, “आज माझ्या मैत्रिणी माझ्या घरी येणार आहेत. अमृता सुभाष, नीना कुलकर्णी, शुभांगी गोखले यांच्यासह संदेश कुलकर्णी…’असेन मी नसेन मी’ या नाटकाची टीम माझ्या घरी आज डिनरसाठी येणार आहे. आपली माणसं जेव्हा घरी येतात…तेव्हा खरंच खूप आनंद होतो. पण, ज्यावेळेला कुणी मला सांगतं की, तुझं Green Door पाहायला मला यायचंय. तेव्हा मग एकदम धडकी भरते…कारण, तुम्ही सगळे माझ्या GreenDoor वर इतकं प्रेम करता. मला खूप समाधान वाटतं. आज नीना ताईंना खास Green Door पाहायचं होतं. तिला माझ्या बागेत फिरताना आनंद मिळेल, अशी आशा आहे.”

नीना कुलकर्णी आणि अमृता सुभाष यांनी बागेतच ताज्या स्वीट टोमॅटोचा आस्वाद घेतला आणि ‘हे टोमॅटो आउटस्टँडिंग आहेत’ असं म्हणत अभिनेत्रीचं कौतुक केलं. नेटकऱ्यांनी सुद्धा या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

“किती सुंदर व्हिडीओ आहे एकदम फ्रेश वाटलं”, “अश्विनी ताई खूप प्रेमळ आणि निरागस आहेत”, “सुंदर…हा एकच शब्द आठवतो”, “ताई खूप सुंदर बाग आहे”, “ही आमची मराठी माणसं…सर्वांशी बोलून चालून राहतात”, “जराही मोठेपणा नाहीये”, “हे व्हिडीओ पाहण्यात खरंच एक वेगळा आनंद आहे” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत.