Ata Thambaycha Naay complete one year: काही चित्रपट मनात घर करतात. ‘आता थांबायचं नाय’ हा अशाच चित्रपटांपैकी एक आहे. १ मे २०२५ ला हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर, रोहिणी हट्टंगडी असे अनेक लोकप्रिय कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकांत दिसले. शिवराज वायचळने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. तसेच, अनेक पुरस्कारांनी चित्रपटाचा गौरव करण्यात आला. आता सिनेमाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शिवराज वायचळने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
“१ मे हा दिवस आयुष्यात खूप खास…”
शिवराज वायचळने सोशल मीडियावर आता थांबायचं नाय सिनेमातील काही खास फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो पोस्ट करत त्याने लिहिले, “आज ‘आता थांबायचं नाय’ला बरोबर एक वर्ष पूर्ण झालं. १ मे हा दिवस आयुष्यात खूप खास बनला आहे. वेळ कसा गेला, अजूनही कळत नाही. स्क्रिप्ट लिहायच्या मिटिंग्स, १०० वेळा दिलेल्या नरेशन्स, सगळं अजूनही ताजं-तवानं डोळ्यांसमोर उभं आहे. ऑक्टोबर २०२३ ला सुरू झालेला एक छोटासा विचार, इतक्या मोठ्या प्रवासात बदलण्यासाठी खूप लोकांची साथ मिळाली आणि त्याबद्दल मनात खूप प्रेम आणि आदर आहे.”
पुढे त्याने लिहिले, “या चित्रपटाशी जोडलेला प्रत्येक जण माझ्याइतक्याच प्रेमाने आणि जिद्दीने काम करत होता. त्यामुळेच हा प्रवास इतका खास झाला. संपूर्ण टीमचा मी मनापासून खूप खूप आभारी आहे. सर्वात आधी तुषार आणि निधी हिरानंदानी यांचे आभार. पहिली फीचर फिल्म मी माझ्या पद्धतीने करू शकलो हा विश्वास आणि ताकद त्यांनी मला दिली. धरम सर एक Gentle Giant प्रोड्यूसर म्हणून खंबीरपणे उभे राहिले. Zee Studios मधून बवेश सर यांनी खूप खूप मेहनतीने आणि हुशारीने संपूर्ण चित्रपट उभा केला त्याबद्दल त्यांचे आणि टीमचे खुप आभार.”
शिवराजने असेही लिहिले, “‘आता थांबायचं नाय’ हे नाव सुद्धा त्यांनीच सुचवलं. बीएमसीच्या सर्व कामगार आणि अधिकाऱ्यांचे आभार ज्यांचा शूटिंग सुरळीत होण्यात खूप मोठा वाटा होता. भूषण गगराणी सर, किरण दिघावकर सर, अमित वैती सर, राजेंद्र लोखंडे सर. ह्या फिल्म ची गोष्ट ज्यांच्या आयुष्यातल्या कर्तृत्वावरून प्रेरणा घेऊन लिहिता आली ते म्हणजे उदयकुमार शिरुरकर, त्यांच्या कामाला सलाम. “
पुढे त्याने लिहिले, “प्रत्येक कलाकृती तयार व्हायला सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे त्याचं लिखाण. ओंकार आणि मी फिल्म चे असंख्य ड्राफ्ट्स केले. त्यानी लिहिलेल्या शेवटच्या मोनोलॉग वर अख्खा चित्रपट बांधता आला. ह्या सगळ्यात अरविंद जगताप सरांची साथ म्हणजे चेरी ऑन द केक.”
सिनेमातील कलाकारांचे कौतुक करत त्याने लिहिले, “आशुतोष गोवारीकर सर, भरत जाधव सर, सिद्धार्थ जाधव, ओम् भूतकर, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे, प्रवीण डाळिंबकर, पर्ण पेठे, दिपक शिर्के, किशोर बच्छाव, रूपा बोरगांवकर, बीएमसीची सर्व मुले आणि रोहिणी हट्टंगडी, तुम्हा सगळ्यांशिवाय या चित्रपटाची मी कल्पनाच करू शकत नाही.”



“बाकी टेक्निकल टीम पण सगळेच मित्र म्हणून जेवढे तेवढेच किंवा त्याहून ही जास्त त्यांच्या कामात उत्तम आहेत. शूटदरम्यानचा असो किंवा प्री व पोस्ट-प्रॉडक्शनमधला शांतपणा असो, हे मला कदाचित टीमकडूनच मिळालं. अनमोल भावे, सौरभ भालेराव, गुलराज सिंग, मनोज यादव, संदीप यादव, प्रद्युम्न चावरे, सचिन लोवलेकर, रिया मॅक्लेन, विक्रांत पवार, संजय सांकला, अर्पिता घोगरदरे, आशीर्वाद हडकर ❤️ अजय गोगावले सर, (आनंदी, निहिरा, मुक्ता, जसराज)जोशी, तुम्हा सगळ्यांना खूप प्रेम. खंदे प्रोडक्शन- अजित सिंग, गणेश सपट, आशिष नरखेडकर आणि टीम.
सुपर direction team – सिद्धेश आव्हाड, ह्रितिक कदम, यश रुईकर, निषाद, अमेय, इरा”, असे लिहित शिवराजने सर्वांचे आभार मानले आहेत.
शेवटी त्याने लिहिले, “आज एक वर्ष पूर्ण. नवीन सिनेमाचं काम सुरू.आता थांबायचं नाय”
शिवराजच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत त्यांचे कौतुक केले आहे. तसेच, आनंदी जोशी, आशय़ कुलकर्णी, अमृता सुभाष या कलाकारांनी कमेंट्स करत चित्रपटाचे व शिवराजचे कौतुक केले आहे.अमृता सुभाषने कमेंट करत तुझा अभिमान आहे, असे लिहिले आहे.

दरम्यान, शिवराज आगामी काळात कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
