Sonam Wangchuk Hunger Strike: दिल्लीतील जंतर मंतरवर पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे उपोषण सुरू असून, त्यांच्या उपोषणाचा आज १९ वा दिवस आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात वांगचुक सहभागी झाले आहेत. त्यांच्यासह काही विद्यार्थ्यांनी उपोषण केले आहे. या उपोषणामुळे सोनम वांगचुक यांचे वजन कमी झाले असून, त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होत आहे. मात्र, अजूनही सरकारकडून कोणतीही चर्चा सुरू करण्यात आलेली नाही. सरकारच्या वतीने कोणीही पुढे न आल्यामुळे संपूर्ण देशातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करून पाठिंबा दर्शविला आहे. त्यावर अभिनेते आणि सामाजिक-राजकीय भाष्यकार अतुल कुलकर्णी यांनी एक दिवसाचे उपोषण करीत असल्याचे जाहीर केले आहे.

प्रश्नपत्रिका फुटी प्रकरण, ’नीट’ परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात कॉक्रोच जनता पार्टीकडून तीव्र आंदोलन केले जात आहे. २५ दिवसांपासून जंतर मंतरवर हे आंदोलन सुरू आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करीत या आंदोलनात सोनम वांगचुक यांच्यासह काही विद्यार्थीही उपोषण करीत सहभागी झाले आहेत. आंदोलकांबरोबर संवाद साधण्याच्या दृष्टीने सरकारने आता चर्चेसाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती अतुल कुलकर्णी यांनी केली आहे. तसेच सोनम वांगचुक हे ज्या त्रासातून जात आहेत, ते समजून घेता यावे म्हणून आणि ते ज्या आंदोलनात सहभागी झाले आहेत, त्याच्याशी जोडलेले राहण्यासाठी एक दिवसीय उपोषण करणार असल्याचे अतुल कुलकर्णी यांनी जाहीर केले आहे.

अतुल कुलकर्णी यांचे एक दिवसीय उपोषण

सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करीत अतुल कुलकर्णी यांनी सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मी माझ्या घरातून एक दिवसाचे उपोषण करीत आहे. हे उपोषण करण्याची दोन कारणं आहेत. सोनम वांगचुक आणि त्यांच्यासह असणारे आंदोलक, ज्या त्रासातून जात आहेत, त्यांच्याबरोबर जोडले जाण्यासाठी आणि आपल्या सरकारला मला विनंती करायचीये की, त्यांनी संवेदनशीलता दाखवावी म्हणून उपोषण करीत आहे. आंदोलन करण्यामागे सोनम वांगचुक आणि त्यांच्या साथीदारांची काही गंभीर आणि महत्त्वाची कारणं आहेत; पण सरकारला आंदोलकांच्या मागण्या आणि त्यांची कारणं महत्त्वाची व योग्य वाटत नाहीत.”

अतुल कुलकर्णी म्हणाले, “आपलं सरकार असंवेदनशील आहे, असं मी अजिबात म्हणणार नाही. कारण- खूप वेळा मी आपल्या सरकारला भावूक झालेलं आणि जनसामान्यांची दुःख समजून घेऊन त्यांच्याबरोबर उभं राहिलेलं पाहिलं आहे. पण, यावेळी मात्र काहीतरी गैरसमज निर्माण झाले आहेत. ज्यामुळे सरकारची संवेदनशीलता दिसून येत नाहीये. आंदोलक व सरकारमध्ये संवाद होत नाहीये. आणि माझी सरकारला एक विनंती आहे, हा संवाद त्यांनी लवकरात लवकर सुरू करावा.”

अतुल कुलकर्णी यांनी देशातील इतर नागरिकांनादेखील या एकदिवसीय उपोषणामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, “सोनम वांगचुक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जे दुःख होतंय किंवा जो त्रास होतोय, त्याची तुम्हाला जाणीव होत असेल, तर तुम्हीसुद्धा एक दिवसाचे उपोषण करण्याचा प्रयत्न करा. एका अनुभवी व्यक्तीने मला सांगितले होते, ‘दुःखाचं दुःखाशी नातं असणं खूप गरजेचं आहे.’ त्यामुळे त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होऊया, त्यांना पाठिंबा देऊया आणि एक दिवसाचे उपोषण करूया.”