Avadhoot Gupte Song For Vidyanand Bapat: गणेशोत्सवातील वाढते ध्वनीप्रदूषण, डीजे आणि लाऊडस्पीकर विरोधात आपली रोखठोक भूमिका मांडणारे विद्यानंद बापट सध्या राज्यभरात चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. विशेष म्हणजे ते आपला मुद्दा अगदी स्पष्ट व थेट अस्खलित मराठीत मांडत आहेत. त्यामुळे त्यांच्या मागण्यांबरोबरच मराठी भाषेनेही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पुण्यातील टिळक रोड परिसरात त्यांच्यावर काही अज्ञातांनी हल्ला देखील केला. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. त्यांच्या विचारांना पाठिंबा देणारे अनेक लोक पुढे आले आहेत. अनेकांनी विद्यानंद बापट यांनी घेतलेल्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. याबाबत मनोरंजन विश्वातून सुद्धा प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

लोकप्रिय संगीतकार-गायक अवधूत गुप्तेने विद्यानंद बापट यांच्या समर्थनात खास गाणं तयार केलं आहे. अवधूत नेहमीच आपल्या हटके संगीत शैलीने प्रेक्षकांना भुरळ घालतो. आता नुकतंच अवधूतने विद्यानंद बापट यांच्यासाठी तयार केलेलं एक खास गाणं चर्चेत आलं आहे. “विद्यानंदा ओळख इथल्या आनंदी आनंदा..” असे या गाण्याचे बोल आहेत.

अवधूत गुप्तेनं विद्यानंद बापटांसाठी लिहिलेल्या गाण्याचे बोल…

स्वच्छ विचार अन्
स्वच्छ वाणीवर
हसणाऱ्या माकडांचा
मंगल असला
पवित्र असला
तरीही देश हा दगडांचा
तुझ्यासारख्या सरळ माणसाचा ना हा धंदा
विद्यानंदा ओळख इथल्या आनंदी आनंदा

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये अवधूतने ‘सपोर्ट बापट’, ‘विद्यानंद बापट सपोर्ट’, ‘हॅट्स ऑफ बापट’ असे हॅशटॅग दिले आहेत. अवधूतचा हा व्हिडीओ सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे.

दरम्यान, विद्यानंद बापट यांच्यासाठी आरती सोलंकीने देखील पोस्ट शेअर केली होती. “विद्यानंद बापट यांना कळकळीची विनंती आहे, फार स्पष्ट मराठी बोलू नका. काय आहे की डीजे आणि ध्वनीप्रदुषण याविरोधात तुम्ही बोलत आहात, पण समोरच्या असुशिक्षित, माजोरड्या, बिनडोक, दीड शहाण्या लोकांना वाटतंय की तुम्ही गणपती बाप्पा आणि गणेशोत्सवाबद्दल बोलत आहात. तुमच्यावर ज्याने हल्ला केला, त्यावरून त्याचे शिक्षण आणि त्याच्यावर झालेले संस्कार दिसून येतात,” असं आरती सोलंकीने पोस्टमध्ये म्हटलं आहे.