‘बजरंगी’ या आगामी मराठी चित्रपटाचं जबरदस्त पहिलं पोस्टर नुकतंच लॉन्च करण्यात आलं आहे. हे पोस्टर पाहूनच चित्रपटाच्या कथेविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. भव्य हनुमंताची मूर्ती, तिच्यासमोर उभा असलेला एक तरुण, आजूबाजूला फडकणारे भगवे ध्वज आणि किल्ल्याची पार्श्वभूमी अशी लक्षवेधी दृश्यरचना पोस्टरमध्ये पाहायला मिळतेय. या भव्य मांडणीतून चित्रपटाच्या कथेला गूढ पार्श्वभूमी असल्याचे संकेत मिळतात. आता यामध्ये प्रमुख भूमिका नेमका कोणता अभिनेता साकारणार याबाबत जाणून घेऊयात…

पोस्टरमध्ये विराट रूपातील हनुमंताची मूर्ती लक्ष वेधून घेते. तिच्यासमोर एक तरुण हातात भगवा कपडा घेऊन उभा आहे. एका बाजूला भव्य हनुमंताचं रूप तर दुसरीकडे किल्ला, भगवे ध्वज आणि आकाशात पसरलेला सोनेरी प्रकाश, यामुळे पोस्टरला प्रभावी आणि सिनेमॅटिक रूप मिळाले आहे. या ‘बजरंगी’ सिनेमात प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव मुख्य भूमिका साकारणार आहे. आपल्या सिद्धूचा एक वेगळा अंदाज यानिमित्ताने सर्वांना पाहायला मिळेल. याशिवाय लोकप्रिय अभिनेत्री हेमल इंगळे देखील या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.

‘बजरंगी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस लोखंडे यांनी केलं असून, लेखन हेमंत एदलाबादकर यांचं आहे. अवंतिका सिने एंटरप्राइजेस या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. पोस्टरमधून चित्रपटाच्या कथेविषयी काही महत्त्वाचे संकेत मिळत असले तरी त्यामागची संपूर्ण कथा आणि व्यक्तिरेखांचा प्रवास चित्रपटातूनच उलगडणार आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक तेजस लोखंडे म्हणाले, “‘बजरंगी’ची कथा एका अशा प्रसंगापासून सुरू होते, जो स्वतःमध्येच अनेक प्रश्न निर्माण करतो. श्रद्धा आणि अविश्वास यांच्यात अडकलेल्या एका माणसाचा हा प्रवास आहे. या प्रवासातून त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या काही अनपेक्षित गोष्टी प्रेक्षकांसमोर येतील. पोस्टरमधून आम्ही कथेचा फारसा उलगडा न करता उत्सुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ही कथा प्रेक्षकांना वेगळा अनुभव देईल, अशी अपेक्षा आहे.”

सिद्धार्थला या नव्या सिनेमासाठी प्रेक्षकांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत, आता हा ‘बजरंगी’ चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार, याची सिद्धार्थचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.