Bandhu Marathi Movie Jitendra Joshi-Upendra Limaye : दोन भावांमधलं नातं कधीही शब्दांत मांडता येत नाही, याच नात्यावर आधारित ‘बंधू’ सिनेमा येत्या २० नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी या कलाकारांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने दोघंही पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत जितेंद्रने ‘बंधू’ सिनेमाबद्दलचा आणि उपेंद्र लिमयेंसह काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.
जितेंद्र जोशी अमोल परचुरेंच्या कॅचअपला दिलेल्या मुलाखतीत सांगतो, “बंधू सिनेमा २० नोव्हेंबरला प्रदर्शित होतोय आणि मी यामध्ये उपेंद्रजी लिमये यांच्यासह काम केलंय. अप्रतिम दिग्दर्शन आणि खूप सुंदर सिनेमा बनवलाय. नितीन सिंधूविजय सुपेकर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय आणि स्वत:च्या काळजाचा तुकडा काढून ठेवावा…अगदी तसा सिनेमा हा माणूस बनवतो. त्यात आपल्या साहेबांचा ( उपेंद्र लिमये ) आवाज. पहिल्या टीझरमध्ये एक वाक्य आहे “राम आहे म्हणल्यावर लक्ष्मण तर येणारच!” म्हणजे उपेंद्रच्या आवाजाला मी कसं मॅच करणार…काय कमाल काम केलंय त्याने आणि महत्त्वाचं म्हणजे मला संपूर्ण सिनेमात खूप सांभाळून घेतलंय…मी आता सांगूही शकत नाही, इतका सुंदर अनुभव होता. शूटिंगदरम्यान खऱ्या अर्थाने तो माझा ‘बंधू’ झाला होता.”
“आपली जर कुणी इतकी मनापासून काळजी घेत असेल, तर मला ते खूप आवडतं. आमच्यामध्ये शूटिंगदरम्यान एकोपा निर्माण झाला होता. तर, खूपच सुंदर अनुभव होता.” अशा भावना ‘बंधू’ सिनेमाबद्दल जितेंद्र जोशीने व्यक्त केल्या आहेत.
बंधू सिनेमाबद्दल…
भावाच्या सुखासाठी स्वतःच्या वाट्याचे काटे दूर करणारा भाऊ, नात्यांमधला विश्वास, मनात दडलेला अहंकार आणि परिस्थितीसमोर उभी ठाकणारी भावनिक परीक्षा…या सगळ्याचा वेध ‘बंधू’ सिनेमा घेणार आहे. नाती, भावना आणि संघर्षांची ही कहाणी पडद्यावरची न वाटता कुठेतरी आपल्या घरातलीच वाटते. प्रेम, संघर्ष, अहंकार, त्याग आणि भावनांची गुंतागुंत यांचा सुरेख मिलाफ असलेली ही कथा प्रेक्षकांना २० नोव्हेंबरपासून एका हृदयस्पर्शी आणि भावनिक प्रवासावर घेऊन जायला सज्ज होत आहे.
