Watch These Marathi Movies On Youtube : मराठी इंडस्ट्रीत आतापर्यंत विविध विषयांवर आधारित अनेक चित्रपट बनले आहेत. यामध्ये अनेक लोकप्रिय कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करणारे अनेक चित्रपट आतापर्यंत मराठीमध्ये बनले आहेत.
‘दशावतार’, ‘गोंधळ’, ‘जारण’ मातीशी जोडलेले, सामाजिक मुद्द्यांवर प्रकाश टाकणारे आणि अशा विविध धाटणीचे अनेक चित्रपट मराठीत बनले आणि अलीकडे काही प्रदर्शित झाले आहेत, म्हणूनच आम्ही तुम्हाला मराठीतील अशा काही चित्रपटांबद्दल सांगणार आहोत जे कदाचित तितकेसे पाहिले गेले नसतील; परंतु त्यांचा विषय निराळा असून हे चित्रपट महत्त्वपूर्ण विषयांवर भाष्यसुद्धा करतात. महत्त्वाचं म्हणजे हे सर्व चित्रपट तुम्ही मोफत यूट्यूबवर पाहू शकता. हे चित्रपट कोणते आहेत याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
यूट्यूबवर पाहा ‘हे’ चित्रपट
पोस्टकार्ड – गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘पोस्टकार्ड’ या चित्रपटात राधिका आपटे, सई ताम्हणकर, किशोर कदम, दिलीप प्रभावळकर, गिरीश कुलकर्णी, ईश्वरी देशपांडे, प्रवीण तरडे, सुबोध भावे आणि वैभव मांगले यांसारखे लोकप्रिय कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये आहेत. यामध्ये पोस्टमॅन पत्र लिहिणाऱ्याच्या खाजगी आयुष्यातील लोकांशी भावनिकदृष्ट्या जोडला जातो असं काहीसं पाहायला मिळतं. हा चित्रपट तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता.
पिंजरा – दिवंगत दिग्दर्शक व्ही. शांताराम दिग्दर्शित व निर्मित ‘पिंजरा’ हा मराठीतील लोकप्रिय चित्रपटांपैकी एक मानला जातो. यामध्ये अभिनेते श्रीराम लागू, संध्या शांताराम, वत्सला देशमुख, निळू फुले यांसारखे मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमधून झळकलेले. यामध्ये एक शिक्षक जेव्हा लावणी करणाऱ्या लोककलाकाराच्या प्रेमात पडतो, तेव्हा त्या दोघांच्या आयुष्यात कोणतं वळण येतं ते या चित्रपटातून पाहायला मिळतं, हा एक भावनिक चित्रपट आहे. तो यूट्यूबसह ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवरही पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
कच्चा लिंबू – अभिनेता प्रसाद ओक दिग्दर्शित ‘कच्चा लिंबू’ हा चित्रपट २०१७ मध्ये प्रदर्शित झालेला. यामध्ये लोकप्रिय दिग्दर्शक व निर्माता रवी जाधव महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये आहे. त्याच्याबरोबर सोनाली कुलकर्णी, मनमित प्रेम, सचिन खेडेकर हे कलाकारही झळकले आहेत. यामध्ये सोनाली कुलकर्णी व रवी जाधव यांनी शैला आणि मोहन या दाम्पत्याची भूमिका साकारली आहे, ज्यांना बौद्धिक अपंगत्व असलेला मुलगा असतो. मुलामुळे त्यांना एकमेकांबरोबर फारसा वेळ घालवायला मिळत नाही, त्यामुळे एकूणच त्यांचे जीवन कठीण झालेलं असतं. हा चित्रपट तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता.
सायकल – प्रकाश कुंटे दिग्दर्शित २०१७ मध्ये प्रदर्शित झालेला हा एक कौटुंबिक कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात भाऊ कदम, प्रियदर्शन जाधव, ऋषिकेश जोशी, दीप्ती लेले यांसारखे अनेक लोकप्रिय कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. ऋषिकेश जोशींनी यामध्ये केशव हे पात्र साकारले आहे, जो एक नामांकित ज्योतिषी असतो. त्याच्याकडे एक सायकल असते, परंतु काही चोर त्याची ती सायकल घेऊन जातात आणि त्यानंतर चित्रपटात महत्त्वाचं वळण येतं. हा चित्रपट तुम्ही यूट्यूबवर पाहू शकता.
रेगे – अभिजीत पानसे दिग्दर्शित २०१४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘रेगे’ हा एक क्राईम थ्रिलर चित्रपट आहे. यामध्ये अभिनेता आरोह वेलणकर, महेश मांजरेकर, संतोष जुवेकर महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये आहेत. एका नामांकित डॉक्टरांच्या मुलाला त्याच्या वडिलांकडून मेडिकल सायन्समध्ये शिक्षण घेण्यासाठी आग्रह धरला जातो, परंतु यानंतर तो मुलगा गुन्हेगारी क्षेत्रात येतो. हा चित्रपट खूप रंजक आहे. झी ५ वरही हा चित्रपट पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
