Bhagyashree Mote Village Photos Viral : गावाकडचे वातावरण म्हणजे मन प्रसन्न करणारा एक वेगळाच अनुभव असतो. ताजी हवा, पक्ष्यांचा किलबिलाट, शेतात पसरलेली हिरवळ आणि मातीचा सुगंध मनातील सर्व थकवा क्षणार्धात दूर करतो. शहरातल्या गाड्यांचा हॉर्न, प्रचंड गर्दी आणि सतत धावपळीची दिनचर्या यापेक्षा पूर्णपणे वेगळा असा शांत व निवांतपणा गावात अनुभवायला मिळतो. गावातली माणसं, त्यांचं आपुलकीचं बोलणं, गप्पा आणि रात्रीच्या वेळी मिळणारी गार वाऱ्याची झुळूक माणसाला पुन्हा एकदा स्वतःशी जोडून घेण्यास मदत करते. त्यामुळे शहरात राहणाऱ्यांना आपलं गाव कायम खुणावत असतं. अगदी मराठी सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत. मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटेही सध्या तिच्या गावी गेली आहे. तिने गावातील काही खास फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.

मराठी कलाकारांचे आणि गावाकडच्या मातीचे नाते नेहमीच खास आणि घट्ट राहिले आहे. शूटिंगचे व्यग्र वेळापत्रक, कॅमेऱ्याचा लखलखाट आणि मुंबई-पुण्यासारख्या धावपळीच्या शहरांत राहून थकल्यानंतर अनेक मराठी कलाकार आपल्या मूळ गावी, निसर्गाच्या कुशीत जाणं पसंत करतात. गावात गेल्यावर मिळणारा हाच शांततापूर्ण काळ त्यांच्यासाठी खास असतो. त्यामुळे अनेक मराठी कलाकार सण-उत्सवांच्या वेळी किंवा कामातून ब्रेक मिळताच आपल्या गावाकडच्या निसर्गरम्य वातावरणाकडे ओढले जातात. सध्या भाग्यश्री मोटेही गावाकडे रमली आहे.

भाग्यश्री मोटेने गावाकडचे खास फोटो शेअर करून गावाकडच्या शांत आयुष्याची झलक दाखवली. इतकंच नाही तर तिने तिच्या गावाचं नावही चाहत्यांना सांगितलं. भाग्यश्रीने गावाकडची विहिर, शेत, रस्ते याचे फोटो पोस्ट केले आहेत. काही फोटोंमध्ये तीदेखील आहे. ‘माझं गाव’ म्हणत तिने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

पाहा भाग्यश्री मोटेच्या गावातील फोटो

किती सुंदर… ग्रामपंचायतही छान काम करताना दिसते, तुमच्या गावातील शेतशिवारात कोणकोणत्या प्रकारची पिके पाहायला मिळतात? तुमच्या गावाचं नाव काय? अशा कमेंट्स भाग्यश्रीच्या या फोटोवर चाहत्यांनी केल्या. त्यावर भाग्यश्रीने स्वतः रिप्लाय देत तिच्या गावाचं नाव सांगितलं. भाग्यश्री मोटेच्या गावाचं नाव मांडवा आहे. भाग्यश्री मोटे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मांडवा गावची आहे.

bhagyashree-mote-village-photos
भाग्यश्री मोटेने सांगितलं तिच्या गावाचं नाव (फोटो- इन्स्टाग्राम)

महाराष्ट्रातील काही भागांत सध्या चांगला पाऊस पडतोय. भाग्यश्रीच्या गावीही पाऊस असल्याचं दिसतंय. ती सध्या गावाकडे रमली असून तिचे फोटो चाहत्यांनाही फार आवडले आहेत.