Bharat Ganeshpure Shares Fan’s Reaction : एखाद्या कलाकारासाठी त्याच्या चाहत्यांकडून येणाऱ्या प्रतिक्रिया किंवा त्यांच्याकडून होणारं कौतुक हे कायमच खास असतं. कारण- प्रत्येक कलाकार आपल्या चाहत्यांसाठी आणि त्यांच्या कौतुकासाठीच मेहनत करत असतो.

अनेकदा प्रेक्षक आपल्या आवडत्या कलाकाराला एका वेगळ्या भूमिकेत बघतात तेव्हा तो कलाकार खऱ्या आयुष्यातही तसाच असेल, अशी प्रेक्षकांची समजूत होते. त्यामुळे हे प्रेक्षक आवडत्या कलाकारांना अनेकदा नकारात्मक भूमिका करू नये, असा सल्ला देताना दिसतात. तसाच सल्ला भारत गणेशपुरे यांना दिला गेला होता.

भारत गणेशपुरे यांनी आजवर विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांना हसवण्याचे काम केले आहे; पण त्याचबरोबर त्यांनी अनेक नकारात्मक भूमिकादेखील केल्या आहेत. याच नकारात्मक भूमिका पाहून एका चाहतीने त्यांना सल्ला दिला होता. काय होता तो सल्ला? चला जाणून घेऊ…

‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत भारत गणेशपुरे चाहतीचा किस्सा सांगत म्हणाले, ” ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ चित्रपटात मी एका इन्स्पेक्टरची भूमिका केली होती. खूप अंगावर येणारी, अशी ती भूमिका होती. नंतर २०१२-१३ साली नाटक करत होतो, हलकं फुलकं या नावाचं. त्या नाटकाचा ठाण्याला प्रयोग होता. प्रयोग झाल्यानंतर प्रेक्षक सहसा फोटो वगैरे काढतात; पण एक बाई बाजूला फक्त उभी होती. मला आधी वाटलं की, ती कुणाबरोबर तरी आली असावी. मी त्यांना विचारलं, “फोटो काढायचा आहे का?” त्या म्हणाल्या, “नाही.” मग मी विचारलं, “तुम्ही कुणाबरोबर आला आहात का?” त्यावरही त्या “नाही”, असं म्हणाल्या. पुढे त्या महिलेनं मला म्हटलं, “मला तुम्हाला एक सांगायचं आहे”. मी म्हटलं सांगा. त्या म्हणाल्या, “तुम्ही आमच्या घरात खूप आवडीचे आहात. आमच्या कुटुंबाला तुम्ही खूपच आवडता. माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे. तुम्ही चित्रपटात ते काम केलं आहे, तसं करू नका.” त्यावर मी म्हटलं, “अहो माझं कामच आहे ते…” त्यावर त्या म्हणाल्या, “बरोबर… ते तुमचं काम आहे, मला माहितीय; पण ते तुम्ही करू नका. ते दुसऱ्याला करू द्या.”

पुढे ते म्हणाले, “टेलिव्हिजनवरील कलाकारांना प्रेक्षक त्यांच्या घरातलेच समजतात. त्यामुळे ते प्रेमानं थेट एखादी गोष्ट पटली, तर सांगतात आणि तसेच ते काही आवडलं नाही, तर तेही बोलतात. टीव्हीमुळे त्यांना आम्ही त्यांच्या घरातलेच वाटतो. त्यामुळे ते बिनधास्त येऊन काही असेल, तर बोलतात. पण हे असं अनेकदा घडतच असतं… याचसाठी केला होता अट्टहास…”