Bharat Jadhav Emotional Story : मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांमध्ये कायमच आपुलकीचं नातं पहायला मिळतं. एखादा कलाकार कुठल्याही संकटात किंवा आर्थिक विवंचनेत असेल तर अनेकजण त्याच्या मदतीला धावून आल्याचे किस्से ऐकायला मिळाले आहेत. असाच एक किस्सा मराठी अभिनेते भरत जाधव यांनी शेअर केला होता.

भरत जाधव हे मधल्या काळात मनोरंजन क्षेत्रापासून काहीसे लांब होते. कामात तोच-तोचपणा येत असल्याचे ओळखून हा ब्रेक घेतला असल्याचे त्यांनी स्वत: अनेक मुलाखतींमधून सांगितलं होतं. त्यांनी घेतलेल्या या ब्रेकबद्दल एके दिवशी नाना पाटेकरांना समजलं आणि त्यांनी भरत जाधव यांना कॉल करून विचारपुस केली होती. भरत जाधव यांनी एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता.

व्हायफळ या यूट्यूब चॅनलला दिलेल्या एका मुलाखतीत भरत जाधव म्हणाले होते, “मधल्या काळात मी ब्रेक घेतला होता. हा ब्रेक माझ्या घरच्यांना आवडला होता. ते म्हणाले की, ‘आराम कर आणि पुन्हा सुरुवात कर’. तेव्हा माझं संपूर्ण कुटुंब माझ्याबरोबर होतं आणि आणखी एका माणसाचं मी नाव घेईन ते म्हणजे नाना पाटेकर. माझं तेव्हा सगळं व्यवस्थितच सुरू होतं; पण त्यांना कुठून तरी कळलं आणि मग त्यांनी मला फोन करून विचारलं की, “कसा आहेस? मला कळलं की, तू टेन्शनमध्ये आहेस. हे बघ काही टेन्शन असेल तर सांग आणि काहीही लागलं तर सांग. अगदी आर्थिक काही असेल तरी मला सांग. तू टेन्शन घेऊन काम करु नकोस.”

Award Banner

यापुढे ते म्हणाले होते, “मी तेव्हा टेन्शनमध्ये नव्हतोच; पण त्यांना कुणी काय सांगितलं माहीत नाही. यामुळे मला खूप बरं वाटलं की, त्या व्यक्तीने मला फोन करून विचारलं. आम्ही तसे भेटलो आहोत. गप्पा मारल्या आहेत. पण नकळत असा एक दिवस त्यांचा फोन येणं आणि त्यांनी माझी विचारपूस करणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. राजसाहेब ठाकरे त्यांनीसुद्धा मला त्या त्या वेळेस आधार दिला. मैत्री ही अशी असते. यामुळे आपल्याला नकळत प्रोत्साहन मिळतं असतं.”

दरम्यान, भरत जाधव हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेते आहेत. आजवर अनेक नाटक, मालिका आणि चित्रपटांमधुन त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. केवळ विनोदीच नव्हे; तर नकारात्मक आणि गंभीर भूमिकांमधून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. गेल्या वर्षात त्यांचा ‘आता थांबायचा नाय’ हा चित्रपट आला होता. यातील त्यांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले. तसेच यावर्षी ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’मधून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले.