Bharat Jadhav Reacted On Marathi Hindi controversy : महाराष्ट्रात काही दिवसांपासून मराठी भाषा आणि हिंदी सक्तीचा मुद्दा चर्चेत आहे. प्राथमिक शाळांमधील हिंदी भाषेची सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन शासकीय आदेश रद्द करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयावर जल्लोष करण्यासाठी शिवसेना (ठाकरे गट) व मनसेच्या वतीने आज (५ जुलै) विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.
कलाविश्वातूनही काही कलाकार मंडळींनी यामध्ये सहभाग घेतल्याचं पाहायला मिळत आहे. आज पार पडणाऱ्या या मेळाव्यात मराठी सिने क्षेत्रातील मोजक्या कलाकारांनी हजेरी लावली आहे. त्यामध्ये लोकप्रिय मराठी अभिनेते भरत जाधव हेसुद्धा सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी हिंदी सक्ती, तसेच मराठी भाषा याबाबत माध्यमांना त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
भरत जाधव यांनी याबाबत ‘एबीपी’शी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “आपल्याच राज्यात राहून आपण अपमानित होत आहोत ही केवढी चुकीची गोष्ट आहे. हे व्हायला नको. याबाबत प्रत्येक जण त्याचं मत व्यक्त करत आहे. मला असं वाटतं की, मराठी माणसानं जागं व्हायला हवं. मराठीपणा जपायला हवा. मी असं म्हणत नाही की, आपण हिंदीला विरोध करतोय. हिंदी भाषासुद्धा चांगलीच आहे; पण तिची सक्ती व्हायला नको हीच आपली मागणी होती”.
मराठी-हिंदी भाषेच्या या वादात भरत जाधव यांच्यासह इतर काही मराठी कलाकारांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अशातच नुकताच मराठमोळा अभिनेता अक्षय केळकर यानंही याबद्दल पोस्ट शेअर करीत त्याची प्रतिक्रिया दिली आहे. अक्षयनं या पोस्टमधून ‘तुम्ही ज्या राज्यात वास्तव्यास आहात, त्या राज्याची भाषा बोलण्याची अपेक्षा करण्यात चूक कशी असू शकते’, असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच ‘ते येत नसल्यास सौजन्यपूर्वक मान्य करावं, असं मतही त्यानं व्यक्त केलं आहे.
दरम्यान, भरत जाधव यांच्यासह अभिनेता सिद्धार्थ जाधवनेसुद्धा मेळाव्यात सहभाग घेतला आहे. राज्य सरकारनं हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानं एकूण मराठीजन आनंदी असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आज मनसे प्रमुख राज ठाकरे व शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्याचं आयोजन केलं असून, त्यामार्फत हा आनंद साजरा केला जात आहे. सोशल मीडियासह सर्वत्र याबद्दल चर्चा होत आहे.