Sasare Bapre Movie Announcement : मराठमोळा अभिनेता भरत जाधव पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यास सज्ज झाला आहे. यावेळी भरत जाधव हा सासऱ्यांच्या भूमिकेमध्ये झळकणार असून, अभिनेता सुव्रत जोशी त्याच्या जावयाची भूमिका साकारणार आहे. मुलगी, जावई अन् सासरा या नात्यांवर आधारित ‘सासरे बापरे’लवकरच प्रदर्शित होणार असून, सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे.
प्रत्येक सिनेमामध्ये मुलीच्या प्रेमाला वडिलांचा विरोध असल्याचे दाखवण्यात येते; पण हाच नियम मोडून लग्न व प्रेमावर वडील काय भूमिका घेतात, याचा उलगडा करणाऱ्या कथानकावर आधारित ‘सासरे बापरे’ सिनेमाची कथा असणार आहे. सिनेमाचे मोशन पिक्चर रिलीज झाले असून, हटके कथा नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरली आहे. विशेष म्हणजे ‘सासरे बापरे’ सिनेमामध्ये मुलीची भूमिका लोकप्रिय अभिनेत्री सायली संजीव साकारणार आहे.
हिरोईनचा बाप व्हीलनच असतो…
इन्स्टाग्रामवर शेअर केल्या गेलेल्या व्हिडीओद्वारे नवरी मुलगी म्हणून सायली संजीव, नवरा मुलगा म्हणून सुव्रत जोशी, तर सासरेबुवा म्हणून भरत जाधव असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्याचबरोबर यामध्ये उपेंद्र लिमयेही महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याचे दिसून आले आहे. ‘सासरे बापरे’ या सिनेमाची घोषणा करताना लिहिले,”हिरोईनचा बाप व्हीलनच असतो…कंचा पण पिक्चर खोलून बघ ना तू! लव्हस्टोरीजचा हा ‘युनिव्हर्सल रुल’ मोडायला आणि त्याला भिडायला येतोय.. ‘सासरे बापरे’”
‘सासरे बापरे’ या आगामी मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल विलास सुर्वे यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद संकेत तांडेल यांनी लिहिले आहेत; तर चित्रपटाला नीलेश मोहरीर यांनी संगीत दिले आहे. चित्रपटाची निर्मिती एलएससीए क्रिएटिव्हज, सिंधिया एंटरटेन्मेंट, सिनेमॅटिक किडा आणि सरवण स्टुडिओज यांनी केली आहे. या चित्रपटात भरत जाधव, सायली संजीव व सुव्रत जोशी यांच्या प्रमुख भूमिका असून, उपेंद्र लिमये विशेष भूमिकेत दिसणार आहेत. ‘सासरे बापरे’ चित्रपट ५ फेब्रुवारी २०२७ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
