Bharati Achrekar Talks About Marathi Industry : आपल्या अभिनयशैलीनं आजवर अनेक मराठमोळ्या कलाकारांनी बॉलीवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. आजही अनेक जण त्यांच्या कामाचं कौतुक करत असतात. माधुरी दीक्षित, नाना पाटेकर यांसारख्या अनेक कलाकारांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यापैकीच एक म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर.
भारती आचरेकर यांनी आजवर अनेक मराठी नाटक आणि हिंदी मालिका व चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांनी त्यांच्या सहजसुंदर अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आणि त्यांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं. सध्या भारती ‘तिघी’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. अशातच त्यांनी मराठी इंडस्ट्रीबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी अनेक मराठी नाटकांमध्ये जरी कामं केली असली तरी त्यांना मराठी मालिका व चित्रपटांसाठी कधी विचारणा झालीच नाही, असं म्हटलं आहे. भारती आचरेकर नेमकं काय म्हणाल्या याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
मला कधी विचारणा झालीच नाही
‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत भारती आचरेकर यांना आतापर्यंत विविध माध्यमांतून आम्ही तुम्हाला पाहिलं आहे. विशेषकरून हिंदी मालिकांमध्ये तुम्ही अधिक काम केलं आहे आणि त्यासाठी तुम्हाला अनेक जण ओळखतात. मराठीमध्ये काम करण्यासाठी इतका वेळ का लागला आणि यापूर्वीसुद्धा मराठी कलाकृतींसाठी विचारणा झाली होती का? असं विचारल्यावर त्या म्हणाल्या, “मला मराठी लोकांनी कधी विचारलंच नाही. आता जवळजवळ गेली ४० वर्षं मी काम करत आहे; पण मी हिंदीतच जास्त काम केलं.”
भारती याबद्दल पुढे म्हणाल्या, “हिंदी मालिका, चित्रपट आणि काही नाटकांमध्ये मी काम केलं. मराठीत फक्त मी नाटकांमध्ये मोठ्या प्रमाणात काम केलं. पहिल्यांदाच मला मालिका आणि चित्रपटासाठी एकत्र विचारणा झाली. यापूर्वी छोट्या छोट्या भूमिका केल्या आहेत पाहुणे कलाकार म्हणून; पण महत्वपूर्ण भूमिकेसाठी कधीच विचारणा झाली नाही. त्यामुळे जेव्हा मला विचारणा झाली तेव्हा मी खूप उत्सुक होते.”
पुढे त्यांना चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना मालिकांसाठी विचारणा झाल्यानंतर त्यांच्या काही अपेक्षा असतात की, मी विशिष्ट भूमिका साकारणार तशा तुमच्या काही अपेक्षा होत्या का? असं विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, “चांगली आणि महत्त्वपूर्ण भूमिका असलीच पाहिजे. त्याशिवाय मी करणार नाही. आता इतकं काम केल्यानंतर दुय्यम भूमिका करण्यात काही अर्थ नाही. ‘तिघी’ चित्रपटातसुद्धा मी महत्त्वपूर्ण भूमिकेतच आहे. पण, चित्रपटात मला कधी इतका महत्त्वाचा रोल मिळेल, असं मला वाटलं नव्हतं, जो मला देवाच्या कृपेने मिळाला. भूमिका निवडताना माझे तसे काही फार निकष नसतात; पण माझ्या भूमिकेची लांबी किती आहे हे मी बघते.”
