भारती आचरेकर या मराठीसह हिंदी कलाविश्वातील ज्येष्ठ व बहुआयामी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी रंगभूमी, चित्रपट आणि दूरदर्शनवर प्रदीर्घ काळ काम केलेलं आहे. त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. अनेक सिनेमांमध्ये त्यांनी साकारलेल्या छोट्या भूमिकाही प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप पाडून गेल्या आहेत. त्या प्रसिद्ध शास्त्रीय गायिका माणिक वर्मा यांच्या कन्या आहेत. इंडस्ट्रीत एवढी वर्षे काम केल्यावर आता मी माझ्या अटींवर काम स्वीकारते असं त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. याशिवाय मनोरंजन विश्वात अलीकडेच आलेल्या लहान मुलांबद्दलचा एक अनुभव त्यांनी यावेळी शेअर केला.

भारती आचरेकर अमोल परचुरेंच्या कॅचअपला दिलेल्या मुलाखतीत सांगतात, “मी एका जाहिरातीचं शूटिंग करत होते…हल्लीची लहान मुलं फार उर्मट असतात. एकवेळ मोठी माणसं बरी असतात. पण, आताच्या बऱ्याच लहान मुलांना आई-वडिलांनी अक्षरश: डोक्यावर बसवून ठेवलेलं असतं. उर्मट पण नाही ही मुलं फार आगाऊ असतात. तर, त्या शूटिंगदरम्यान १२ वर्षांचा मुलगा असेल. तो शॉट संपल्यावर माझ्याजवळ आला आणि उगाच काहीतरी विचारायला लागला.”

अभिनेत्री पुढे म्हणाल्या, “मला वाटलं असंच काहीतरी बोलायला आला असेल. पण, पुढे तो काहीतरीच विचारायला लागला. तुमचं लग्न झालंय का, तुम्हाला मुलं आहेत का…मी तेव्हा त्याच्या आईला म्हटलं, ‘प्लीज तुम्ही याला घेऊन जाता का?’ पण, त्यानंतरही त्याने मला विचित्र प्रश्न विचारले. मग तेव्हा मला राग आला आणि मी म्हणाले, ‘प्लीज याला घेऊन जा…नाहीतर मी याला फटका देईन. ( मैं इसको थप्पड मारूंगी )’ तेव्हा मग तो मुलगा घाबरला आणि गेला.”

“पण, या अशा टोकाच्या गोष्टी बोलाव्या लागतात. नाहीतर या मुलांना कळत नाही. बरं ही मुलं आई-वडिलांमुळेच इतकी आगाऊ झालेली आहेत. या मुलांना एखादी जाहीरात मिळाली तरी आई-बाबांना असं वाटतं की…माझा मुलगा आता शाहरुख खानच होणार. आता या लहान मुलांपासून मी थोडी लांबच असते. त्या मानाने जे तरुण मुलं-मुली असतात ते लोक माझा खूप आदर करतात. हल्ली कामही मी थोडंच करते. ११-७ मध्येच काम करते, आता मी त्यापेक्षा जास्त काम करत नाही. मी मढमध्ये शूटला जात नाही…कारण मला ते जमत नाही आणि माझी ठरलेली वेळ असते तेव्हाच शूट करणार असं मी ठरवलंय. कारण, आता इतके वर्षे काम केल्यावर आपण आपल्या अटींवर काम करायचं हे मी ठरवलंय.” असं भारती आचरेकर यांनी सांगितलं.

“मी माझ्या मुलाचा एकटीने सांभाळ करू शकले कारण, तेव्हा परिस्थिती फार वेगळी होती. तेव्हा इतके चॅनेल्स वगैरे नव्हते, काहीच नव्हतं. त्यामुळे माझ्या मुलाला वाढवणं मला तसं सोपं गेलं. कारण, तेव्हाच्या मुलांना फोकस करणं वगैरे या सगळ्या गोष्टी माहिती होत्या. या व्यतिरिक्त आई काम करतेय, ती शूटिंगसाठी बाहेर असणार याची माझ्या मुलाला सवय झाली होती. त्यानेही कलाक्षेत्रात करिअर केल्यामुळे मला कधीच काही त्रास झाला नाही.” असंही त्यांनी सांगितलं.