Bhau Kadam Daughter Mrunmayee Kadam Viral Video : लोकप्रिय मराठी अभिनेते भाऊ कदम यांची लेक मृण्मयी हिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. खरं तिने व्हिडीओ करण्याचं कारणही खूपच मजेशीर आहे. मृण्मयीचं लग्न झालंय, अशा आशयाची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. ही पोस्ट तिला अनेकांनी शेअर केली. यानंतर तिने व्हिडीओ शेअर करून प्रतिक्रिया दिली.

मृण्मयीला तिच्या लग्नासंदर्भात पोस्ट वाचल्यानंतर हसू आवरत नाहीये. तिने इन्स्टाग्रामवर लग्नाची व्हायरल होणारी खोटी पोस्ट शेअर करून खिल्ली उडवली आहे. सध्या शिक्षणासाठी अमेरिकेत असणारी मृण्मयी म्हणते की तिच्याच लग्नात किमान तिला तरी बोलवायला हवं होतं. “कमेंट्समध्ये मला माझ्या लग्नासाठी बोलवा,” असं कॅप्शन देत तिने हा मजेशीर व्हिडीओ पोस्ट केला आहे.

“तुम्ही मला माझ्या लग्नात बोलावलंच नाही, हे बरोबर नाही. मला तरी कळायला हवं होतं की मी विवाहित आहे. मी अमेरिकेत असून माझं लग्न झालंय हे मला आता कळतंय. तर आता मला असं वाटतंय की किमान ही बातमी साखरपुड्याची असती तरी ठिके, थेट लग्न. हे काही बरोबर नाही. ज्या कुणी केलंय त्यांना नीट काम करता येत नाहीये,” असं मृण्मयी म्हणाली.

पाहा मृण्मयीचा व्हिडीओ

दरम्यान, मृण्मयीच्या या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. झालं लग्न आता काय बोलवायचं, अभिनंदन, तुझ्या लग्नात तू आम्हालाही बोलावलं नाहीस, तुझ्या लग्नात तुला बोलावलं नाही हे काही बरोबर नाही, जे झालं ते झालं आता पार्टी दे, आधी कुंकू लाव, तुझ्या बाबांना पण तुझं लग्न झालंय हे आताच कळलं असेल, वाईट फक्त हेच वाटतंय की आहेर कुणाला द्यावा, अभिनंदन दिल्या घरी सुखी राहा, लग्नाचे फोटो कधी पोस्ट करतेस, अशा मजेशीर कमेंट्स मृण्मयीच्या व्हिडीओवर आहेत. अनेकांनी हसणारे इमोजीदेखील कमेंट केले आहेत.

मृण्मयी कदम जवळपास दोन वर्षांपासून अमेरिकेत शिक्षण घेतेय. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. तिथे ती सण-उत्सव कसे साजरे करते, याची झलक आपल्या अकाउंट्सवर शेअर करत असते. त्याचबरोबर ती कंटेट क्रिएटर आहे. तिचे सोशल मीडियावर २५ हजार फॉलोअर्स आहेत.

Award Banner