Swapnasundari Movie Teaser Video : भूषण प्रधान प्रमुख भूमिकेत असलेला एक रॉमकॉम सिनेमा येत्या जुलै महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये प्रेक्षकांना भूषण प्रधान आणि सायली पाटील यांची फ्रेश जोडी पाहायला मिळेल. सायली यापूर्वी ‘घर बंदूक बिर्याणी’, ‘येक नंबर’, ‘झुंड’ अशा सिनेमांमध्ये झळकली आहे. तर, ‘स्वप्नसुंदरी’ सिनेमात नायकाच्या आईची भूमिका साकारणार आहेत लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा नवलकर. सध्या ‘ठरलं तर मग’ मालिकेमुळे त्यांना घराघरांत प्रतिमा आत्या म्हणून ओळखलं जातं.

लग्न, योग्य जोडीदाराचा शोध, लग्नापूर्वी ठेवलेली अट यावर आधारित ‘स्वप्नसुंदरी’ या आगामी चित्रपटाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमध्ये मराठी सिनेविश्वातील चॉकलेट बॉय अभिनेता भूषण प्रधान ‘राघव’ची मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. तर अभिनेत्री सायली पाटील ‘मानसी’च्या भूमिकेत झळकणार आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या टीझरमध्ये राघवची मजेशीर झलक पाहायला मिळतेय. तो लग्नासाठी मुलींना भेटत असतो, मात्र त्याच्या मनात एक अशी ‘स्वप्नसुंदरी’ असते जी त्याच्यासाठी परफेक्ट लाईफ पार्टनर ठरेल. मुली शोधण्याच्या या गंमतीशीर प्रवासात त्याला मानसी भेटते. आता मानसी आणि राघवचं सूत जुळेल का? मानसीच राघवची ‘स्वप्नसुंदरी’ आहे का? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना २४ जुलैपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अक्षय शिंदे म्हणाले, “आजच्या तरुणाईसाठी लग्नाचा निर्णय आणि योग्य जोडीदाराची निवड हा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि तितकाच गोंधळात टाकणारा विषय झाला आहे. हीच गोष्ट आम्ही हलक्या-फुलक्या, विनोदी आणि मनोरंजक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. भूषण प्रधानने ‘राघव’ची भूमिका अतिशय उत्तमरित्या जिवंत केली असून, अनेकांना त्याच्यात स्वतःचा भास होईल. कथा जरी राघवची असली तरी हा संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून आनंद घेण्यासारखा चित्रपट आहे, जो प्रेक्षकांना नक्कीच आपलासा वाटेल.”

राघवच्या आयुष्यातील ‘स्वप्नसुंदरी’ कोण ठरणार आणि त्याच्या लग्नाची गाठ अखेर कशी जुळणार, याची उत्सुकता आता वाढली असून त्यासाठी प्रेक्षकांना २४ जुलैची प्रतीक्षा करावी लागणार आहे. यामध्ये सायली पाटील, भूषण प्रधान यांच्यासह शिल्पा नवलकर, अशोक शिंदे, माधवी जुवेकर असे कलाकार झळकणार आहेत.