Bhushan Pradhan Latest Post: मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता भूषण प्रधान आपल्या फिटनेस आणि प्रोजेक्ट्ससोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असतो. सध्या त्याच्या सोशल मीडिया पोस्टने लक्ष वेधून घेतलं आहे. त्याच्या पोस्टमध्ये २४ जुलै २०२६ ही तारीख दिली आहे. त्यामुळे त्याच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक चाहत्यांनी अभिनेत्याच्या ताज्या पोस्टवर कमेंट करून नक्की लग्न करतोय का, असं विचारलं आहे.

भूषण प्रधानच्या पोस्ट चाहत्यांची उत्सुकता वाढवणाऱ्या असतात. २४ जुलै २०२६ या तारखेने चाहते त्याच्या लग्नाबाबत अनेक तर्कवितर्क लावत आहेत. भूषण खरोखरच विवाहबंधनात अडकणार का, की हा एखाद्या नव्या प्रोजेक्टचा भाग आहे, अशी चर्चा सुरू आहे.

भूषण प्रधानची पोस्ट

भूषण प्रधानच्या पोस्टमध्ये त्याला एका तरुणीने मिठी मारली आहे, असं दिसतंय. फोटोत तरुणीची पाठ दिसतेय, तर भूषणचा चेहरा दिसतोय. दोघांनी एकमेकांच्या हातावर हात ठेवले आहेत. दोघांच्याही बोटात अंगठ्या आहेत. “२४ जुलै २०२६ ही तारीख लक्षात ठेवा आणि आमच्या नव्या सुरुवातीचे साक्षीदार व्हा,” असं फोटोवर लिहिलं आहे. कॅप्शनमध्येही भूषणने तारीख टाकली आहे.

चाहत्यांनी भूषणच्या पोस्टवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. त्याचबरोबर अभिनेत्री मयुरी देशमुख, नम्रता संभेरावसह अनेकांनी भूषण प्रधानच्या या पोस्टवर कमेंट्स करून शुभेच्छा दिल्या आहेत.

खरं तर भूषण प्रधानने अद्याप ही पोस्ट लग्नाबद्दल आहे की आगामी सिनेमाबद्दल आहे, ते स्पष्ट केलेलं नाही. पण त्यावरील तारीख बघता ती त्याच्या चित्रपटाबद्दल असण्याची दाट शक्यता आहे. साधारणपणे दर आठवड्याच्या शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित होतात, २४ जुलैलादेखील शुक्रवार आहे, त्यामुळे त्यादिवशी त्याचा चित्रपट रिलीज होईल, अशी शक्यता आहे.

भूषणने यापूर्वी एकदा अशीच पोस्ट केली होती. त्याने अभिनेत्री केतकी नारायणबरोबरचे काही फोटो पोस्ट केले होते. त्याचे हे फोटो पाहून चाहत्यांना त्याचं व केतकीचं ठरलंय, असं वाटलं होतं. त्या पोस्टवरही कमेंट्स करून चाहत्यांनी ‘तुमचं ठरलंय का?’ असं विचारलं होतं. आता पुन्हा एकदा भूषणने असाच फोटो पोस्ट केल्याने चर्चांना उधाण आलं आहे. भूषणच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो ‘घरत गणपती’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘जुनं फर्निचर’सारख्या चित्रपटांसाठी ओळखला जातो.