सत्य काय असतं? आपण जे डोळ्यांनी पाहतो ते? की कानांनी ऐकतो ते? की समोरच्याने सांगितलेलं ऐकून आपण जे निर्माण करतो ते? की यापैकी काहीच नाही? हे प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे सिड विंचुरकरने दिग्दर्शित केलेला आणि सई ताम्हणकरची मध्यवर्ती भूमिका असलेला बोल बोल राणी हा चित्रपट. या चित्रपटाने एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की मराठीत असे प्रयोग नक्की व्हायला हवेत.

चित्रपटाचं कथानक अगदी थोडक्यात

चित्रपट सस्पेन्स थ्रिलर या जॉनरचा आहे. त्यामुळे एका सत्याचा शोध आणि त्याचे समोर येणारे पैलू एवढीच कथा आहे. पण चित्रपट पहिल्या प्रसंगापासूनच पकड घेतो. आभास (सुबोध भावे) नावाचा पत्रकार आहे तो एका घटनेचा शोध घ्यायला गावात आलाय. त्यानंतर काय घडतं? ते चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. आगीत काय जळालं ते राखेलाच ठाऊक या संवादाने चित्रपटाची दमदार सुरुवात होते आणि त्यानंतर आपण प्रेक्षक म्हणून चित्रपटात गुंतत जातो. शेवटी सत्य हाती लागतं का? याचं उत्तर चित्रपट पाहिल्यावरच मिळेल.

चित्रपटात कलाकरांचा अभिनय कसा आहे?

चिन्मय मांडलेकर, सुबोध भावे, संभाजी सासणे या तिन्ही कलाकारांनी त्यांच्या भूमिकेला न्याय दिला आहे. त्यांना दिलेलं काम हे तिघंही चोखपणे करतात. अभिनयाच्या बाबतीत बाजी मारली आहे ती सई ताम्हणकरने. सईला या चित्रपटात पाहणं म्हणजे पर्वणी आहे. सई ताम्हणकरने साकारलेली ‘माया’ जबरदस्त. माया हे पात्र सई जगली आहे. शिवाय तिच्या अभिनयाची आणखी एक कमाल बाजू म्हणजे तिचे डोळे. संवादापेक्षा सई डोळ्यांमधून जे बोलली आहे ते निव्वळ लाजवाब. खास करुन मध्यंतरानंतरच्या प्रसंगात तिने जे काही भाव डोळ्यांमधून दाखवले आहेत ते कमाल आहेत. प्रत्येक अभिनेत्रीला एक खास भूमिका हवी असते. त्या भूमिकेसाठी ओळखली जाते असं म्हटलं जातं. सईच्या आयुष्यात आलेली माया ही भूमिका तशीच आहे असं म्हटलं तरीही अतिशोयक्ती ठरणार नाही. आपल्या अभिनयाचे रंग सईने मायामध्ये लीलया भरले आहेत. सुरुवातीपासून शेवटपर्यंतच्या फ्रेममध्ये सईला पाहणं सुखावह आहे.

Bol Bol Rani Movie Review
बोल बोल राणी हा चित्रपट सध्या चर्चेत आला आहे. (फोटो-सई ताम्हणकर, इन्स्टाग्राम)

कथानकाची खासियत काय?

बोल बोल राणी चित्रपट पाहून अकिरा कुरोसोवा दिग्दर्शित राशोमनची आठवण आल्याशिवाय राहत नाही. एक घटना आणि त्याचे समोर येणारे पैलू. याचा उत्तम मेळ राशोमन मध्ये घातला गेला होता. सत्य जर कॅलिडोस्कोप सारखं असतं तर कसं दिसलं असतं? जेवढं फिरवू तेवढ्या छटा, तेवढी नक्षी तसंच काहीसं बोल बोल राणीच्या कथेचं स्वरुप आहे. चित्रपटातले संवादही उत्तम आहेत. मात्र जिथे डोळ्यांनी बोलायचं आहे तिथे डोळ्यांनी बोलायचं काम सई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर आणि संभाजी सासणे या तिघांनी उत्तमरित्या केलं आहे.

चित्रपटाचं दिग्दर्शन आहे?

सिड विंचुरकरचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. त्याने खूप चांगला प्रयत्न केला आहे. दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांच्या मनात प्रश्नांचं वर्तुळ निर्माण करण्यात तो यशस्वी झालाय. पण एक बाब मान्य करावी लागेल की चित्रपटाला एक प्रकारचं अपूर्णत्व आहे ते वर्तुळ त्याला पूर्ण करता आलं असतं. पण त्याने क्लायमॅक्सचा परिणाम साधत प्रेक्षकांवर ती जबाबदारी टाकली आहे. सिड विंचुरकरची ही शैली आजवर अनेकांनी आजमावली आहे. त्यामुळे बोल बोल राणी हा चित्रपट वेगळा ठरतो, अस्वस्थ करतो. एका उंचीवर नेतो आणि शिवाय प्रेक्षक म्हणून आपल्या मेंदूला झिणझिण्या आणण्याचं कामही करतो. शिवाय चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू म्हणजे ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांचं पार्श्वसंगीत, प्रेक्षक म्हणून ते आपल्याला खिळवून ठेवतं.

चित्रपटात कच्चे दुवे आहेत का?

चित्रपटात काही कच्चे दुवे राहिले आहेत, यात काही शंका नाही. पण ते बाजूला सारुनही चित्रपट पाहणं ही एक पर्वणी ठरते. त्यामुळे मेंदूला झिणझिण्या आणण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर नक्की बघा बोल बोल राणी!