Vicky Kaushal Want To Work In Marathi Movie : ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’, ‘सॅम बहादुर’, ‘जरा हटके जरा बचके’, ‘सरदार उधम’, ‘मसान’ आणि २०२५ मध्ये आलेल्या ‘छावा’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता म्हणजे विकी कौशल. आपल्या दमदार अभिनयाने त्यानं अनेक प्रेक्षकांची मनं जिंककी आहेत. त्याच्या ‘छावा’ चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेचं सर्वच स्तरातून विशेष कौतुक झालं.

आजवर बॉलीवूड सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या विकीने आता मराठी सिनेमांत काम करायचं असल्याच म्हटलं आहे. नुकत्याच एका पुरस्कार सोहळ्यात विकीनं त्याची मराठी सिनेमात काम करायची इच्छा असल्याचं सांगितलं. तसंच त्यानं त्याच्या मराठीतल्या आवडत्या दिग्दर्शकाचं नावसुद्धा सांगितलं. यावेळी विकी नेमकं काय म्हणालाय, चला जाणून घेऊ…

विकी कौशलला नुकताच लोकमतचा महाराष्ट्रीयन ऑफ द इअर हा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यानं आपल्या आनंदी भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, “२०१९ मध्ये उरी सिनेमानंतर मला हा पुरस्कार मिळाला. त्यानंतर आता २०२६ मध्ये हा पुरस्कार मिळाला. माझ्यासाठी हा खूप मोठा सन्मान आहे. माझी कर्मभूमी आणि जन्मभूमी महाराष्ट्रच आहे.”

मराठी सिनेमात काम करायला आवडेल? विकी कौशल म्हणाला…

यानंतर विकीला ‘तुझ्यामते खरा महाराष्ट्रीयन कोण आहे’, असा प्रश्न विचारण्यात आला. याचं उत्तर देत अभिनेता म्हणाला, “ज्याचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे आणि जो छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानतो तो महाराष्ट्रीयन आहे.” पुढे त्याला ‘एखाद्या थोर नेत्यावरील मराठी सिनेमात काम करायला आवडेल का’, असं विचारलं. या प्रश्नाचं उत्तर देताना विकी म्हणाला, “अशी खूप नावे आहेत. जो अनसंग हिरो असेल; त्याच्यावरचा सिनेमा करायला मला आवडेल. छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण जगाला माहित आहेत. तसंच छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्रासह संपूर्ण जगात पोहोचावेत, असं आम्हाला वाटत होतं. तर अशाच एका अनसंग हिरोवर सिनेमा आला, तर मला तो करायला आवडेल.”

आवडता मराठी दिग्दर्शक कोण? विकी कौशलने घेतलं ‘हे’ नाव

शेवटी त्याला मराठी सिनेमा करायला आवडेल का? आणि कोणत्या दिग्दर्शकाबरोबर काम करायला आवडेल? असं विचारलं. यावर विकी म्हणाला, “मराठी सिनेमे खूप आवडतात.” तसंच त्यानं आवडत्या दिग्दर्शकांमध्ये नागराज मंजुळे, अविनाश अरुण या दिग्दर्शकांची नावे घेतली.

दरम्यान, पुरस्कार स्वीकारताना त्याने मराठी भाषेतून संवाद साधत प्रेक्षकांचे आभार मानले. “सर्वांना माझा नमस्कार… तुम्ही म्हटलं मी महाराष्ट्रीय नाही. पण, माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी महाराष्ट्र आहे. माझ्यासाठी हा फक्त पुरस्कार नाही, तर महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राच्या लोकांचा आशिर्वाद आहे”, असं म्हटलं.