Cannes Film Festival 2026 : ७९ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलची सुरुवात १२ मे रोजी झालेली आहे. ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ हा जगातील सर्वात प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे. या सोहळ्याला यंदा भारतील कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. आलिया भट्ट, अदिती राव हैदरी, हुमा कुरेशी, तारा सुतारिया, करण जोहर यांच्यासह मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता पुष्कर जोग सुद्धा यंदा कान्सच्या रेड कार्पेटवर झळकल्याचं पाहायला मिळालं.

पुष्कर पाठोपाठ ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, निवेदिता सराफ, प्राजक्ता माळी आणि अंकिता वालावलकर हे कलाकार सुद्धा फ्रान्सला पोहोचले आहेत.

अंकिता फ्रान्सला निघतानाचे फोटो शेअर करत लिहिते, “हा माझ्यासाठी स्वप्नवत क्षण आहे. मी माझी उत्सुकता शब्दांत व्यक्त करू शकत नाही. आज या मंचावर उभं राहताना सर्वात मोठा अभिमान एका गोष्टीचा आहे ,मी माझ्या मराठीचं प्रतिनिधित्व करतेय.”

आता या कलाकारांचा फ्रान्समधून एक खास व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये हे सगळे ‘भारत पव्हेलियन’मध्ये उपस्थित राहिल्याचं पाहायला मिळत आहे. अशोक सराफ, निवेदिता सराफ, प्राजक्ता माळी, अंकिता वालावलकर या चौघांची झलक यामध्ये पाहायला मिळतेय. प्राजक्ता वाइन कलरच्या ऑफ शोल्डर गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसतेय. ‘अभिजात मराठी ओटीटी’ या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

याशिवाय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते आशुतोष गोवारीकर हे ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’चे (IFFI) नवनियुक्त संचालक म्हणून भारताचं प्रतिनिधित्व करतील.

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. आता हे कलाकार रेड कार्पेटवर कोणता लूक करणार याकडे चाहत्यांचं लक्ष असेल. या भव्य सोहळ्याची सांगता २३ मे रोजी होईल.

काही दिवसांपूर्वीच पुष्कर जोगने सुद्धा कान्सच्या रेड कार्पेटवर उपस्थिती लावली होती. तो म्हणाला, “आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे, फ्रेंच पापाराझी यांच्यासह हॉलीवूडचे लोकप्रिय कलाकार, प्रसिद्ध अभिनेत्यांचा तुमच्या शेजारी असणारा वावर…हे सगळं माझ्यासाठी खूप खास होतं. मी यासाठी कृतज्ञता व्यक्त करतो.”

दरम्यान, कान्स फिल्म फेस्टिव्हल म्हटल्यावर सर्वांचं लक्ष असतं ऐश्वर्या राय बच्चनकडे…तिला ‘कान्सची क्वीन’ म्हणून ओळखलं जातं. यावर्षी ऐश्वर्या या सोहळ्याच्या क्लोझिंग सेरेमनीला उपस्थित राहणार असल्याचं बोललं जात आहे.