‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे अभिनेता-लेखक डॉ. निलेश साबळेचं नाव घराघरांत लोकप्रिय झालं. जवळपास १० वर्षं तो ‘चला हवा येऊ द्या’मध्ये सूत्रसंचालकाची भूमिका निभावत होता. मात्र, यंदा या शोच्या नव्या सीझनमध्ये निलेश साबळे आणि भाऊ कदम हे दोन कलाकार सहभागी झाले नव्हते. प्रेक्षकांनी या दोघांनाही प्रचंड मिस केलं. याचं कारण म्हणजे, गेल्या काही महिन्यांपासून निलेश एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करतोय. त्याचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि यामध्ये भाऊ कदम सुद्धा झळकणार आहेत. या सिनेमाच्या शूटिंगमुळे आणि व्यग्र शेड्युलमुळेच या दोघांनीही शोमध्ये सहभाग घेतला नव्हता.
आता डॉ. निलेश साबळे नेमका कोणता सिनेमा दिग्दर्शित करतोय, यामध्ये किती कलाकार असतील हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे. अखेर, निलेशने स्वत: ‘लोकमत फिल्मी’शी संवाद साधताना या सिनेमाबद्दल खुलासा केला आहे. मात्र, अजूनही अभिनेत्याने चित्रपटाची कथा आणि नाव गुलदस्त्यातच ठेवलं आहे.
निलेश साबळे म्हणाला, “सिनेमाचं काम अगदी उत्तम सुरू आहे. जवळपास ८० टक्के सिनेमा पूर्ण झालेला आहे. पावसामुळे मी आऊटडोअर शूटिंग थांबवलं होतं. पण, आता काही दिवसांत ते उरलेलं २० टक्के शूटिंग मी पूर्ण करेन. अर्थात, माझ्यासाठी हे एक चॅलेंज आहे…कारण, सगळ्या प्रेक्षकांना थिएटरपर्यंत आणायचंय. अलीकडे टीझर किंवा ट्रेलर पाहूनच समजतं की, आपल्याला हा सिनेमा पाहायला जायचंय की नाही…त्यामुळे हे प्रत्येकासाठीच एक प्रकारचं चॅलेंज आहे. आता लोकांनाही काहीतरी वेगळं पाहायचंय आणि त्यासाठी माझा हा प्रयत्न आहे.”
तो पुढे म्हणाला, “मला या सिनेमासाठी कुठेही घाई करायची नाहीये. म्हणून मी शांतपणे हे काम पूर्ण करतोय. प्रेक्षकांना ही कलाकृती आवडेल अशी माझी अपेक्षा आहे…हा अजिबात अतिआत्मविश्वास नाहीये. खूप विचार करून हा सिनेमा मी बांधायचा प्रयत्न करतोय. आपल्या मराठी इंडस्ट्रीमधले खूप दिग्गज कलाकार या सिनेमात काम करत आहेत. त्यामुळे त्या कलाकारांचा अनुभव ही सुद्धा या चित्रपटासाठी खूप मोठी शिदोरी आहे. या सिनेमाचा विषयही वेगळा आहे आणि मोठा आहे…ज्यावेळी वेळ येईल तेव्हा मी या सिनेमाची घोषणा करेन. सध्या सिनेमावर काम सुरू असल्याने आताच मी नेमकं काय हे तुम्हाला सांगत नाहीये. पण, प्रेक्षकांना निश्चितपणे काहीतरी वेगळं देण्याचा माझा प्रयत्न असेल आणि तुम्ही आशीर्वाद द्याल अशी मला खात्री आहे.”
“मराठी चित्रपटसृष्टीतले ३७ कलाकार यामध्ये झळकणार आहेत आणि हा आकडा वाढूही शकतो कारण, अजूनही शूटिंग बाकी आहे. उगाच भव्य काहीतरी करायचं म्हणून मी त्यांना घेतलंय असं काहीच नाहीये. त्यांच्या भूमिका या कथेला धरुन आहेत. कारण, आयुष्यात बाकी सगळं होईल पण, तुमच्याकडे कागदावर कथाच चांगली नसेल तर काहीच होणार नाही. लवकरच तुम्हाला याची कथा आणि इतर गोष्टी कळतील.” असं निलेश साबळेने स्पष्ट केलं आहे.
