भारताचे ‘चांद्रयान ३’ यशस्वीरित्या अवकाशात झेपावलं. आज (१४ जुलै) दुपारी २.३५ मिनिटांनी चंद्रायानाचे आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपण करण्यात आले. ‘चांद्रयान २’ मोहिमेच्या अपयशामुळे इस्रोचे वैज्ञानिकाचे मनोबल खचले होते. आता त्या अपयशाच्या स्मृती विसरून नव्याने चंद्रावर स्वारी करण्यासाठी ‘चांद्रयान ३’ अवकाशात झेपावलं आहे. ‘चांद्रयान-3’च्या यशस्वीरित्या उड्डाणानंतर सर्वच स्तरातून शुभेच्छा देण्यात येत आहे. एका मराठमोळ्या अभिनेत्याने परदेशातून ‘चांद्रयान-३’ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा- “दाढ काढलीस?”, नेटकऱ्याच्या कमेंटला सिद्धार्थ चांदेकरने दिले भन्नाट उत्तर; म्हणाला, “अहो लय…”
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. सिद्धार्थतने व्हिडीओ शेअर करत भारतापासून चंद्रापर्यंत असे कॅप्शन दिले आहे. ‘चांद्रयान ३’ मुळे जगाला भारताचा अभिमान वाटेल असंही सिद्धार्थ म्हणाला. सिद्धार्थ सध्या अमेरिकेत आहे. तिथे तो त्याच्या अगामी प्रोजेक्टचे शुटींग करत आहे.
२०१९साली चंद्रयान-२ मोहिमेमध्ये ‘विक्रम’ या लँडरचे अलगद अवतरण करण्याचा प्रयत्न ‘इस्रो’ने केला होता. या लँडरसोबत चंद्राच्या पृष्ठभागावर फिरणारा ‘रोव्हर’ही धाडण्यात आला होता. मात्र लँडर चांद्रपृष्ठावर कोसळल्यामुळे ही मोहीम अयशस्वी ठरली. आता चंद्रयान-३ मोहिमेत या त्रुटी दूर करण्यात आल्याची माहिती ‘इस्रो’ने दिली आहे.
हेही वाचा- ‘चांद्रयान-३’ यशस्वी प्रक्षेपणानंतर मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव, म्हणाले “आम्हाला अभिमान…”
ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस हा लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविण्यात येणार आहे. वैज्ञानिकांमध्ये ‘फॅट बॉय’ म्हणून ओळखले जाणारे एलव्हीएम-३ (पूर्वीचे जीएसएलव्ही-एमकेएल-२) हे प्रक्षेपणयान अतिशय जड वस्तूमान अंतराळात घेऊन जाण्यास सक्षम आहे. आतापर्यंत प्रचंड यशस्वी ठरलेल्या या प्रक्षेपणयानाची ‘चंद्रयान-३’ ही चौथी मोहीम आहे.
