Chhaava Actor Ashish Pathode Blessed with Baby Boy: मराठी मनोरंजन विश्वातून एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. ‘छावा’ सारख्या गाजलेल्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता आशिष पाथोडे बाबा झाला आहे. आशिष आणि त्याची अभिनेत्री पत्नी प्रियांका टोके यांनी हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत केले असून, ही बातमी त्याने स्वतः आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
आशिष व प्रियांका टोके यांच्या घरी लग्नानंतर पाच वर्षांनी पाळणा हलला आहे. प्रियांका टोकेने गुरुवारी, २ एप्रिल २०२६ रोजी मुलाला जन्म दिला. “आमचा हात धरण्यासाठी एक नवा इवलासा हात आला आहे, त्याचं प्रेम सोन्यासारखं अनमोल आहे, स्वर्गातून मिळालेली ही एक भेट आहे, आमचे हृदय प्रेमाने भरले आहे,” असा आशय लिहिलेला फोटो आशिषने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
पाहा आशिष पाथोडेची पोस्ट
आशिषच्या या पोस्टवर मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार आणि त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. प्रियंका तेंडोलकर, अन्वेषी जैन, नवज्योत बांदिवडेकर, शुभांगी लाटकर यांनीही या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत.
आशिष पाथोडेचे चित्रपट
आशिष पाथोडे मूळचा चंद्रपूरचा आहे. त्याच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो केवळ एक अभिनेता नसून एक उत्तम दिग्दर्शक आणि लेखक म्हणूनही ओळखला जातो. त्याने ‘छावा’ चित्रपटात अंताजी हे पात्र साकारले होते. त्याचबरोबर ‘घरत गणपती’ या चित्रपटातही त्याने काम केलं होतं. आशिषने मस्तराम, फूटफेरी, ठाकरे, अजहर, हंसा, रिडीकूलस, कँडल मार्च या चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या होत्या.
आशिष पाथोडे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो त्याच्या कामाबद्दलच्या अपडेट्स सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. त्याचबरोबर पत्नीबरोबरचे अनेक फोटोही पोस्ट करत असतो. त्याची पत्नी प्रियांकाही अभिनेत्री आहे. दोघेही अनेक चित्रपटांच्या प्रिमियरला एकत्र हजेरी लावत असतात.
आता आशिष पाथोडे बाबा झाल्याने आनंदात आहे. लग्नानंतर पाच वर्षांनी तो बाबा झाला आहे. चाहत्यांनी दिलेल्या शुभेच्छांनी तो भारावून गेला आहे.
